



सोलापुरात भाजपच्या नाराजांवर शिवसेनेचे जाळे ; निवडणुकीपूर्वी होऊ लागले प्रवेश
सोलापूर : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सोलापूर शहरात दिवसेंदिवस अनेक राजकीय घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. सत्तेतील महायुती स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या स्वबळावर लढवणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाले आहे. त्यामुळे सर्व पक्ष स्वबळाची भाषा करत आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना सुद्धा आता तयारीला लागल्याचे पाहायला मिळते. भाजपमधील नाराज असलेल्या नेत्यांवर शिवसेना आपले जाळे टाकत असून अशा नेत्यांच्या हातात धनुष्यबाण दिला जात आहे.
विधानसभा निवडणुकीत पद्मशाली समाजाकडून समाजातील शहर मध्य साठी इच्छुक असलेल्या श्रीनिवास संगा या नेत्याने माघार घेत घेतली होती. आता तोच नेता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत शिवसेनेत गेला आहे. पूर्व भागात संगा यांचे नाव कायमच चर्चेत राहते. त्यामुळे आगामी महापालिकेच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून निश्चितच महापालिका लढवण्याचे संकेत दिले आहेत.
याचबरोबर शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांच्या उपस्थितीत अशोक चौक भागातील सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवार, आनंद विटकर, व लक्ष्मण पवार यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केले, याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख तुकाराम मस्के, युवानेते श्रीनिवास संगा, कामगार सेना जिल्हाप्रमुख सायबन्ना तेगेळी, सचिन जवळकर उपस्थित होते.
एकीकडे प्रभाग सहा मध्ये आमदार देवेंद्र कोठे यांनी भाजपची ताकद वाढवली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अमोल शिंदे यांच्यासमोर हे तगडे आव्हान राहणार आहे. काही कार्यक्रम मध्ये अमोल शिंदे यांनी नाव न घेता देवेंद्र कोठे यांच्यावर अनेक वेळा टीका केली आहे. त्यामुळे यापूर्वी एकत्रित निवडून आलेल्या या दोन नेत्यांमध्ये आता बिनसल्याचे पाहायला मिळते.




















