सोलापुरात शरद पवारांना दुसरे कोणी भेटत नाही का? पुन्हा महेश गादेकरच
सोलापूर : महेश कोठे यांच्या निधनानंतर सुधीर खरटमल यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष कोण अशी चर्चा समोर आली पण यापूर्वी शहराचे अध्यक्ष पद भूषविलेले महेश गादेकर यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ पडली आहे. पण शरद पवार यांना सोलापुरात गादेकर सोडले तर दुसरे कोणी नाही का? असा प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत आहेत जर एका युवा कार्यकर्त्याला शहराध्यक्ष पदाची संधी दिली असती तर बरे झाले असते असेही आता बोलले जात आहे.

महेश कोठे यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस ताब्यात घेतल्यानंतर काँग्रेस मधील नाराज सुधीर खरटमल यांच्यासह माझी महापौर नलिनी चंदेले, माजी महापौर यु एन बेरिया यांनी पक्षात प्रवेश केला. त्यामध्ये खरटमल यांच्या गळ्यात शहराध्यक्ष पदाची माळ घालण्यात आली. विधानसभा निवडणूक झाली त्यानंतर महेश कोठे यांचे प्रयाग येथील कुंभमेळ्यात स्नान करताना हृदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्यामुळे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरात अडचणीत आली. खरटमल यांनी सुद्धा तुतारी बाजूला ठेवून दादांचे घड्याळ हाती बांधले.
यामुळे सोलापुरात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस एकाकी पडल्याचे दिसून आले पण पक्षाने लगेच माजी शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्यावर शहराध्यक्ष पदाची पुन्हा जबाबदारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी शहराध्यक्ष पद निवडीचे पत्र काढले आहे.
पण पक्षामध्ये ज्येष्ठ नेते जरी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले असले तरी बरेच युवा कार्यकर्ते अजूनही आहेत. त्यात जर एका कार्यकर्त्यांना पक्षाने डेरिंग करून शहराचे अध्यक्ष केले असते तर पक्षाला नव संजीवनी मिळाली असती तेच तेच चेहरे कशाला असेही प्रश्न कार्यकर्ते उपस्थित करत आहेत.




















