इंद्रधनु सोसायटीत रंगला विनोदी आळशी डान्स ; गणेशोत्सव धुमधडाक्यात होतोय साजरा
सालाबाद प्रमाणे यंदाही इंद्रधनु सोसायटीमध्ये गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत आहे. इंद्रधनुतील रहिवाशांना रोज महाप्रसादाची सोय करण्यात येत आहे. संगीत खुर्ची ,हस्ताक्षर स्पर्धा, वृत्तपत्र अभिवाचन स्पर्धा, बॅडमिंटन, फॅशन शो तसेच रेकॉर्ड डान्स अशा स्वरूपाच्या स्पर्धा रोज उत्साहाने पार पडत आहेत.
यंदा स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपाची प्रश्नमंजुषा स्पर्धा कुलकर्णी तत्कालीन कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद सोलापूर यांच्या समन्वयाने इंद्रधनु मध्ये झोकात पार पडली त्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगात विचारले जाणारे प्रश्न सुद्धा पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आले व त्यांनीही व्यवस्थित उत्तरे देऊन इंद्रधनुवासियांची मने जिंकली. वृत्तपत्र अभिवाचन स्पर्धेत वृत्तपत्राची गोडी लहान मुलांच्या मनात निर्माण व्हावी व त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी डॉक्टर कामतकर यांनी अथक परिश्रम घेऊन ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली.
हस्ताक्षर स्पर्धेतील स्पर्धकांचे अक्षर हे वाखाणण्याजोगे होते व त्यात बक्षीस देताना परीक्षकांची तारांबळ उडाली म्हणजेच अलीकडची पिढी सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धेत आपले नैपुण्य दाखवू शकते हे सिद्ध झाले. “नाच रे मोरा “या गाण्यावरील इंद्रधनुचे नृत्य व्हायरल झाले होते “याच नाच रे मोरा” चा भाग तीन साजरा झाला यात मराठी गाण्यांवर आळशी विनोदी नृत्य सादर करण्यात आली यात कुलकर्णी व त्यांच्या संघाने इंद्रधनु वासियांची मने जिंकली.
या नृत्यात प्रामुख्याने कुलकर्णी, पवार, विक्रम बंडेवार, कल्कोटे, सुहास व जगदीश कुलकर्णी, श्रीधर व अश्विनी माने, पल्लवी बंडेवार, डॉक्टर प्रतिभा व डॉक्टर रमेश उकरंडे, रमेश गुजर, ढेरे यांचा सहभाग उल्लेखनीय होता व वयाची पन्नाशी पार केल्यानंतर सुद्धा नृत्याने सर्वांची मने जिंकता येतात याची प्रचिती या कार्यक्रमात आली. यातील सर्व स्पर्धक हे त्यांच्या क्षेत्रात तसेच उद्योगजगतात नाव कमावलेले आहेत.
“मराठी असे आमुची मायबोली” तत्त्वावर आधारित मराठी गाण्यांवर सादर केलेल्या नृत्याची छायाचित्रे व क्षणचित्रे आपणांसमोर आनंद निर्माण करण्यासाठी आम्ही दाखवत आहोत.
गणेशोत्सवातील कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक इंद्रधनुने केलेले असून त्यात अंकुश कुंभार यांचा सहभाग उल्लेखनीय आहे. यानंतरही उर्वरित दिवसात कोणत्या स्पर्धा होतात व दरवर्षीप्रमाणे गाजणारा “गीत गुंजन”हा गाण्याचा कार्यक्रम सुद्धा नक्कीच लक्षात ठेवण्याजोगा असेल अशी खात्री बाळगायला हरकत नसावी.