

रेड आर्मी जिल्हाधिकारी कार्यालयात ; फोटो काढण्याचा पालकमंत्र्यांना ही आवरला नाही मोह
आपत्तीजन्य परिस्थितीत अडकलेल्या महिलांच्या बचावासाठी आता सोलापूर जिल्ह्यात महिला रेस्क्यू टीम सज्ज झाली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेली ही टीम महाराष्ट्रातील दुसरी महिला रेस्क्यू टीम ठरली असून, महिलांच्या सहभागामुळे बचाव कार्य अधिक प्रभावी आणि समावेशक होणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शक्तिकुमार ढोले हे या टीमचे नेतृत्व करीत आहेत.
दरम्यान ही महिला रेस्क्यू टीम आणि त्यांच्या सोबतची पुरुषांची रेस्क्यू टीम ही स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात उपस्थित होती. सर्वांनीच रेड टी शर्ट घातल्याने त्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या सर्व रेस्क्यू टीमचे अभिनंदन करत पाठीवर शाबासकीची थाप दिली ज्यावेळी ते महिला रेस्क्यू टीम जवळ आले तेव्हा त्यांना त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरला नाही. फोटो काढत त्यांनी सर्वांचेच मनोबल वाढवण्याचे पाहायला मिळाले.