सोलापुरात शिंदे शिवसेनेला जोरदार धक्का ; जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांचा राजीनामा
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक मोठा धक्का बसला असून सोलापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी तडकाफडकी आपला राजीनामा एकनाथ शिंदे यांच्याकडे दिला आहे.
या राजीनामा पत्रामध्ये सावंत यांनी नाराजी व्यक्त करताना सोलापूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी मला न विचारता परस्पर करण्यात आले आहेत तसेच माझ्या माढा तालुक्यातील तालुकाध्यक्ष, शहरप्रमुख यांच्याही निवडी परस्पर झाल्याने पक्षश्रेष्ठींचा माझ्यावर विश्वास नसल्याचे सिद्ध होते. त्यामुळे मी माझ्या पदाचा राजीनामा देत आहे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये शिंदे गटाच्या शिवसेनेत अनेक नवीन पदाधिकारी यांनी प्रवेश घेतला आहे. त्यामध्ये माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शोभा बनशेट्टी यांचे प्रवेश झाले आहेत. हे प्रवेश करताना लोकसभा संपर्कप्रमुख महेश नाना साठे तसेच अनिता माळगे यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. यामध्ये शिवाजीराव सावंत यांचा कुठेही सहभाग दिसला नाही त्यामुळे गटबाजीला उधाण आल्याचे पाहायला मिळाले. आता सावंत सरांनी राजीनामा दिल्याने सोलापुरातील त्यांचे समर्थक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.