सोलापुरात शिवसेनेचे ‘मिशन टायगर’ नंतर आता ‘छावा’ ; जिल्हाध्यक्ष पद नाकारून हा नेता जातोय शिवसेनेत?
सोलापूर : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने नुकतेच सोलापूर जिल्ह्यात मिशन टायगर सक्सेस केले. यामध्ये अनेक नेत्यांचा यशस्वी सहभाग पाहायला मिळाला. त्यामध्ये विशेष करून अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील बोरामणीच्या महिला जिल्हा आघाडीच्या अनिता माळगे यांचा मोठा वाटा होता.
आता पुन्हा शिवसेनेच्या गळाला आणखी एक काँग्रेसचा नेता लागला असल्याचे चित्र दिसत आहे. ते म्हणजे माजी आमदार पुत्र, दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले भगीरथ भालके. शिवसेनेचे मिशन टायगर सक्सेस झाले आता मिशन छावा असे नाव असल्याचे बोलले जात आहे.
माजी आमदार भारत नाना भालके यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळाली परंतु केवळ दोन ते अडीच हजाराच्या फरकाने त्यांचा पराभव झाला. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मात्र त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला. पण विधानसभा निवडणुकीत ते शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षाकडून पंढरपूर मंगळवेढा या मतदारसंघात इच्छुक होते.
जागा वाटपामध्ये काँग्रेसने ही जागा स्वतःकडे घेतली आणि भगीरथ भालके यांना काँग्रेसने तिकीट दिले पण तिथेही त्यांचा पराभव झाला. तेव्हापासून भगीरथ भालके हे काँग्रेस पासून दूरच आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पद भगीरथ यांच्या गळ्यात घालण्यासाठी सोलापूरचं नेतृत्व प्रयत्न करीत होतं पण त्यांना अपयश आले. भालके यांनी काँग्रेसची साथ सोडण्याचा निर्णय घेतला त्याच्या समजते.
राज्याचे रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या पंढरपूर दौऱ्यात भगीरथ त्यांच्यासोबत पाहायला मिळाले. भालके यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाल्याची माहिती मिळत असून त्यांचे दोन विषय जे एकनाथ शिंदे यांच्यासमोर मांडून त्यानंतरच ते शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेणार असल्याचे खात्रीशीर माहिती सूत्रांकडून मिळाली.
आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला सोलापूर जिल्ह्यात हा मोठा धक्का मानला जात आहे. काँग्रेसचे स्थानिक नेतृत्व याबाबत चिंतन करणार का? हे सुद्धा पाहणे महत्त्वाचे ठरेल.