जात पडताळणी खात्यातील लोकसेवकाची लाच प्रकरणातून निर्दोष मुक्तता
यातील तक्रारदारांना त्यांच्या मुलीच्या पुढील शिक्षणासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने त्यानी संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज दाखल केलेला होता. सदरचा अर्ज प्रत्यक्षरीत्या देण्यासाठी तक्रारदार हा सोलापूर येथील जात पडताळणी कार्यालयात गेला असता, तेथील कार्यरत शिपाई मच्छिंद्र भांडेकर यांनी तक्रारदाराची कागदपत्रे पाहून ती दाखल करून घेण्यासाठी व लवकरात लवकर काम करून देण्यासाठी म्हणून तक्रारदाराकडे रक्कम रु. 15,000 लाचेची मागणी केली होती.
त्याबाबत तक्रारदाराने आरोपी भांडेकर यांच्याविरुद्ध सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे तक्रार दाखल केलेली होती. तक्रारदाराच्या तक्रारीनुसार शासकीय पंचांसमक्ष आरोपीकडून करण्यात आलेल्या लाचेच्या मागणीची पडताळणी करण्यात आली. आरोपी भांडेकर यांनी तक्रारदाराच्या मुलीचे जात पडताळणी प्रमाणपत्र लवकरात लवकर करून देण्यासाठी रक्कम रु. 15,000 लाचेची मागणी करून तडजोडीअंती लाच रक्कम रु. 7,000 स्वीकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झालेले होते.
त्यानुसार आरोपी भांडेकर यांच्याविरुद्ध पुढील सापळा रचण्यात आला, सदर सापळा कारवाईत आरोपी भांडेकर यांना लाच रक्कम रु. 7,000 तक्रारदाराकडून स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी अटक करून आरोपीविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याचे कलमान्वये सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर आरोपीविरुद्ध सोलापूर येथील विशेष जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले होते.
सदर प्रकरणात सरकार पक्षातर्फे एकूण तीन साक्षीदार तपासण्यात आले होते. सरकार पक्षातर्फे तपासण्यात आलेल्या साक्षीदार व कागदपत्रांच्या आधारे आरोपी मच्छिंद्र भांडेकर यांनी लाचेची मागणी केल्यासंदर्भातील कोणताही ठोस व सबळ पुरावा आलेला नसून साक्षीदारांच्या जवाब अनेक महत्त्वपूर्ण विसंगती व त्रुटी असल्याचे, तसेच आरोपीस तक्रारदाराचे कोणतेही काम करून देण्याचे अधिकार नसल्याचे माहित असताना देखील केवळ कायदेशीर प्रक्रियेस बगल देऊन तात्काळ जात वैधता प्रमाणपत्र मिळणेसाठी तक्रारदाराने आरोपी भांडेकर यांना खोटेपणाने गुंतविण्यात आल्याचे मे. न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सदर प्रकरणात आरोपी मच्छिंद्र भांडेकर यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून लोकसेवक आरोपी मच्छिंद्र भांडेकर यांची लाचलुचपत प्रतिबंध कायद्याचे कलम 7, 13(1)(ड), सह 13(2) मधून सोलापूर येथील मे. विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. योगेश राणे साहेब यांनी निर्दोष मुक्तता केलेली आहे. सदर प्रकरणात आरोपीच्यावतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. शिल्पा कुलकर्णी (भारत सरकार नोटरी), ॲड. ओंकार परदेशी, ॲड. राणी गाजूल व ॲड. मधुश्री देशपांडे यांनी काम पाहिले.




















