काँग्रेस राष्ट्रवादीच्या कुबड्या घेऊन भाजपचे सुभाष देशमुख जिंकणार का? विजय देशमुख खरेच बापूंसोबत…..?
सोलापूर : दुश्मन का दुश्मन अपना दोस्त होता है असे राजकारणात बोलले जाते. तशी अनेक राजकीय उदाहरणे देता येतील. सोलापूरच्या बाजार समिती निवडणुकीमध्ये सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे दोन आमदार एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. या निवडणुकीत कल्याणशेट्टी दादा राहणार की बापू मालक होणार याकडे संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यासह आता राज्याचे हे लक्ष लागले आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती ही उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्याच्या कार्यक्षेत्रात येते. या दोन्ही तालुक्यांमध्ये सोसायटी वर माजी आमदार दिलीप माने आणि दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे यांचे वर्चस्व आहे. या निवडणुकीत तब्बल 11 जागा या सोसायटी मतदारसंघातून निवडून द्यायचे आहेत त्यामुळे सोसायटीवाल्यांचेच वर्चस्व राहते हे ओळखून आणि आपल्या विधानसभा मतदारसंघातील 35 गावाचे कार्यक्षेत्र पाहता भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी या निवडणुकीत उडी घेतली आहे.
सुरुवातीला सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन ही निवडणूक लढवण्यासाठी कल्याणशेट्टी यांनी प्रयत्न केले परंतु सुभाष देशमुख यांना काही नेत्यांचा तिरस्कार असल्याचे बोलले जाते तसेच पुत्र प्रेमापोटी सुद्धा त्यांनी ही निवडणूक लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांची ही निवडणूक असल्याचे ओरडून सांगताना सुभाष देशमुख यांनी पॅनल उभे केले. त्या पॅनलमध्ये दक्षिण तालुक्यातील बोरामणी येथील काँग्रेसचे माजी पंचायत समिती सदस्य घनेश अचलारे यांना त्यांनी सहभागी केले आणि या निवडणुकीसाठी त्यांनी मदत घेतली आहे ती म्हणजे, काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, निवडणुकीतून माघार घेण्याची नामुष्की आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, विकास पॅनल मधून डावललेले काँग्रेसचे बाळासाहेब शेळके, ज्येष्ठ नेते जाफरताज पाटील, ज्यांच्या वडिलांनी बाजार समिती स्थापन केली परंतु आज तिथे त्यांचे वर्चस्व कमी झाले अशा एका कुटुंबातील दोन नेत्यांना सोबत घेऊन सुभाष देशमुख निवडणूक लढवत आहेत.
या निवडणुकीसाठी सुभाष देशमुख यांना पक्षातील त्यांचे कट्टर विरोधक आमदार विजयकुमार देशमुख यांची मदत घ्यावी लागली आहे त्यांनी सहकार्य करावे म्हणून ते त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयात ही जाऊन आले आहेत. मुळात या दोन्ही तालुक्यात विजयकुमार देशमुख यांचा बाजार समितीमध्ये यांना मानणारा मतदार नाही, त्यांची सोसायटी नाही किंवा त्यांच्या ग्रामपंचायती नाहीत त्यामुळे त्यांचा बापूंना यांना कितपत फायदा होणार हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.
या निवडणुकीसाठी आज रविवारी मतदान होत आहे संपूर्ण राज्याचे लक्ष सोलापूरकडे लागले आहे.