सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार हे सत्तेमध्ये सहभागी झाल्याने राष्ट्रवादी पक्षात थेट शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. यामुळे दोन्ही पक्षात नव्याने पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. अजित पवार गटाच्या सोलापूर जिल्हाध्यक्ष सोलापूर शहर युवक अध्यक्ष जिल्हा युवक अध्यक्ष या पदांवर कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु अद्यापही शहराध्यक्ष पदाची निवड केली गेलेली नाही.
शहराध्यक्ष पदासाठी प्रदेशवर काम करणारे संतोष पवार, माजी युवक अध्यक्ष जुबेर बागवान, महानगरपालिकेचे माजी गटनेते किसन जाधव यांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली होती. सर्वानुमते संतोष पवार यांच्या नावाला पसंती सुद्धा देण्यात आली.परंतु जिल्ह्यावर मराठा समाजाचे दीपक साळुंखे पाटील यांना संधी दिल्याने पुन्हा मराठा समाजाला शहराध्यक्ष पद नको म्हणून शहराध्यक्ष पदाचे घोंगडे भिजत ठेवण्यात आले आहे.
मराठा समाजाला संधी नको असे पक्षश्रेष्ठींचे म्हणणे आहे त्यामुळे संतोष पवार यांचा नाइलाज होत आहे. पण हे पद मुस्लिम समाज किंवा भटक्या विमुक्त समाजात द्यावे अशीही मागणी होत असून माजी गटनेते किसन जाधव आणि जुबेर बागवान ही दोन नावे पक्षासमोर आहेत. जिल्हाध्यक्ष निवडून काही महिने होऊन गेले तरीही सोलापूर शहराध्यक्ष पदाची निवड केली जात नाही.
शहराध्यक्ष पद नियुक्त करण्यात विलंब होत असल्याने आता अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. जे कायम अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले त्यांच्यापैकीच जर संधी मिळत नसेल तर आमचा काय फायदा असा नाराजीचा सूर सोलापूरच्या कार्यकर्त्यांमधून ऐकण्यास मिळत आहे. अजित दादा आमच्यावर विश्वास नाही का असाही प्रश्न उपस्थित होत असून शहराध्यक्ष पदाची निवड लवकरात लवकर व्हावी अशी कार्यकर्त्यांची मागणी वाढल्याचे दिसत आहे.