आमदार सुभाष देशमुख यांनी प्रचार शुभारंभांचा साधला असा संगम ; ठरलंय यंदा…सुभाषबापू तिसऱ्यांदा !!
सोलापूर दि. ६ : सुभाषबापू देशमुख यांनी त्यांच्या आमदारकीच्या गेल्या दहा वर्षांच्या कार्यकाळात दिलेली सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुका चौफेर विकास करत आहे. या पाणीदार आमदाराला तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने निवडून विधानसभेत पाठवा, असे आवाहन भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दक्षिण सोलापूर तालुकावासियांना केले. ‘ठरलंय यंदा…सुभाषबापू तिसऱ्यांदा’ असा जयघोष करत तालुकावासियांनी त्यांना प्रतिसाद दिला.
भीमा आणि सीना नदीचा संगम होणाऱ्या हत्तरसंग कुडल येथील संगमेश्वर मंदिराच्या प्रांगणात बुधवारी (दि. ६) आमदार सुभाष देशमुख यांच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फुटला. त्यावेळी श्री. दानवे हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कर्नाटकचे राज्यसभा खासदार इरण्णा कडाडी, भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, जिल्हा सरचिटणीस मनीष देशमुख, वृषाली चालुक्य, संगप्पा केरके, राम जाधव, रामप्पा चिवडशेट्टी, मळसिद्ध मुगळे आदी उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जेवढी कामे झाले नव्हती त्यापेक्षा कितीतरीपटीने अधिक कामे सुभाषबापूंनी केवळ दहा वर्षांमध्ये केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंतर्गत रस्ते, पाणी, सौरऊर्जा, ३३ केव्हीए वीजकेंद्र, पर्यटन केंद्रांचा विकास अशा सर्वच विकासात्मक बाबींना सुभाषबापूंनी गती दिली आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ तालुक्यातील सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोहोचविला आहे. विशेषतः वडापूर बॅरेजला राज्य शासनाकडून मिळालेल्या मंजूरीमुळे दक्षिण तालुका सुजलाम सुफलाम होणार आहे. याचे श्रेय पूर्णतः सुभाषबापूंना जाते, अशा शब्दांत व्यासपीठावरील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आमदार सुभाष देशमुख यांचे कौतुक केले.
यावेळी श्रीनिवास करली, विशाल गायकवाड, अंबिका पाटील, नीलिमा शितोळे, वैशाली पवार, हणमंत कुलकर्णी, अनंत बिराजदार, महादेव होनमाने, नामदेव पवार यांच्यासह भाजपचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील नेते, कार्यकर्ते तसेच मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंद्रुप एमआयडीसी होणारच
काँग्रेसने नेहमीच दक्षिण सोलापूर तालुक्याला निरक्षर व गरीब ठेवण्याचा प्रयत्न केला. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तालुक्याच्या विकासासाठी भरघोस निधी दिला. संगमेश्वर तीर्थक्षेत्र विकासासाठी आतापर्यंत तेरा कोटी रुपये मंजूर होऊन काम सुरू झाले. आता पुढील १७३ कोटींचा प्रस्तावही नक्कीच मंजूर होईल. महाविकास आघाडी सरकारने मंद्रुप एमआयडीसी होण्यात खोडा घातला. मात्र आमदारकीच्या तिसऱ्या टर्ममध्ये मी मंद्रुप एमआयडीसी उभी करणारच.
— सुभाष देशमुख
योजना बंद करण्यात ‘मविआ’ माहीर
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना लोकसभा निवडणुकीत पाडणारी काँग्रेस आता केवळ आंबेडकरी समाजाची मते मिळविण्यासाठी ‘संविधान बचाओ’ म्हणत आहे. महाविकास आघाडी सर्वसामान्यांच्या भल्याची एकही योजना आखू तर शकत नाहीच, उलट आमच्या चांगल्या योजना बंद पाडू शकते. अडीच वर्षांच्या शासनकाळात मविआने राज्यातील सर्व विकासात्मक प्रकल्प रखडवले. लाडकी बहीण योजना देखील बंद व्हावी अशी मविआची इच्छा आहे. पण महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर आम्ही लाडक्या बहिणीला प्रतिमहिना २१०० रुपये देणार आहोत.
— रावसाहेब दानवे