चेतन नरोटे यांच्या प्रचार कार्यालय उद्घाटनाला आघाडीचे नेते आवर्जून उपस्थित ; मोची- मुस्लिम नेत्यांची हजेरी
सोलापूर शहर मध्य या विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार चेतन नरोटे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन मंगळवारी खासदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस भवन येथे झाले. या सोहळ्याला महाविकास आघाडीचे नेते आवर्जून उपस्थित होते. काँग्रेस वर नाराज झालेल्या मुस्लिम आणि मोची समाजातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.
या उद्घाटन सोहळ्याला शिवसेनेचे पुरुषोत्तम बरडे, उपनेत्या अस्मिता गायकवाड, राष्ट्रवादीचे भारत जाधव, जनार्दन कारमपुरी, काँग्रेसचे प्रकाश यलगुलवार, विश्वनाथ चाकोते, संजय हेमगड्डी, रियाज हुंडेकरी, तौफिक हत्तूरे, अलका राठोड, विनोद भोसले, सुशील बंदपट्टे, महीला शहराध्यक्ष प्रमिला तूपलवंडे, जुबेर कुरेशी, नजीब शेख, नरसिंह आसादे, मनोज यलगुलवार, नरसिंग कोळी, फिरदौस पटेल, युवराज जाधव, बसवराज म्हेत्रे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर काँग्रेस भवनच्या सभागृहात झालेल्या सभेत प्रणिती शिंदे म्हणाल्या, मी पंधरा वर्षे हा मतदारसंघ सांभाळला, आता मी तुमच्या हवाली करते, जर लोकशाही सोलापुरात टिकली असेल तर ते शहर मध्य या मतदारसंघात. जात धर्माची भाषा करतो, त्याला इथली लोक थारा देत नाहीत. तेढ निर्माण करण्याची भाषण केली जातात, पण जात पात धर्म बाजूला ठेवून जनता मतदान होते. जिथे काँग्रेस असते तिथे तेढ निर्माण होऊ शकत नाही. महाराष्ट्राचं संतुलन बिघडवायचे नसेल असे शहर मध्य मध्ये काँग्रेस विजयी होणे गरजेचे असल्याचेही सांगताना उमेदवार चेतन नरोटे यांच्या कार्याचे कौतुक केले, शहर मध्य हा काँग्रेस सोबतच राहणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
चेतन नरोटे भाषणात म्हणाले, मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, मला हे एकनिष्ठेचे फळ मिळाले. अनेक प्रसंग आले पण काँग्रेस सोडला नाही, शिंदे साहेबांनी मुला सारखे प्रेम दिले. तळागाळातल्या मुलाला तिकीट मिळाले, काँग्रेसने कधी घाणेरडे राजकारण केले नाही, पण आज पक्ष बदलण्याची फॅशन झाली. दहा पक्ष बदलतात आणि आम्ही एकनिष्ठ म्हणून सांगतात असे म्हणून भाजप उमेदवाराला नकळत टोला हाणला.