ओबीसींच्या न्याय हक्कासाठी माझी उमेदवारी ; युवराज राठोड यांचा परिवर्तनाचा निर्धार
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात यंदा चांगली चुरस पाहायला मिळत आहे. या ठिकाणी चौरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतीय जनता पार्टी शिवसेना, परिवर्तन विकास आघाडी, वंचित बहुजन आघाडी, इतर अपक्ष सह काँग्रेसची बंडखोरी सुद्धा होण्याची शक्यता आहे.
या सर्वामध्ये एक चेहरा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे तो म्हणजे दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांचा.
दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा सर्वाधिक ओबीसींची संख्या असलेला मतदारसंघ आहे.
या मतदारसंघात बंजारा, धनगर, मुस्लिम, लिंगायत, माळी, साळी आणि कोळी असे ओबीसी प्रवर्गात मोडणारे समाज आहेत.
लिंगायत समाजासाठी बसव पुरस्कार, मुस्लिम समाजासाठी कव्वाली कार्यक्रम, महिलांसाठी दांडीया, फेरीवाल्यांना छत्री वाटप, हॉस्पिटलच्या माध्यमातून दक्षिण तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवेची मदत असे अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे जनतेशी थेट संबंध जोडला गेला आहे.
या ओबीसींचा चेहरा म्हणून युवराज राठोड हे मतदारांसमोर जात आहेत, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा विषय असेल समाजाचे वेगवेगळे मुद्दे असतील, त्यांचे प्रश्न, समस्या त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण यंदा पूर्ण ताकदीने मैदानात उतरल्याचे राठोड यांनी सांगितले.
दक्षिण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेल्या लोकप्रतिनिधींनी समाजाच्या नावावर मते घेतली पण नंतर ते समाजाला विसरले हा इतिहास आहे, पण दक्षिणच्या जनतेने संधी दिली तर संपूर्ण ओबीसींच्या न्याय हक्कासाठी आपला पुढील लढा असेल असे ही त्यांनी सांगितले.
दरम्यान त्यांच्या मागे फार मोठ्या अदृश्य शक्तीचा पाठिंबा असल्याची चर्चा आहे.