दक्षिण मध्ये काँग्रेस नेता बंडखोरीच्या तयारीत? ; राज ठाकरे यांच्या भेटीने खळबळ
सोलापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या यशानंतर सोलापूरच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून सुमारे 20 पेक्षा अधिक कार्यकर्ते विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक झाले आहेत.
यामध्ये बहुतांश नेते हे लिंगायत समाजातील असल्याने काँग्रेस पुढे उमेदवारी द्यायची कुणाला असा मोठा पेच निर्माण झाला आहे. परंतु त्यातच सिद्धेश्वर परिवाराचे नेते धर्मराज काडादी यांनी मैदानात उडी घेतल्याने अनेक इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान भाजपच्या संपर्कात असलेले लिंगायत समाजातील नेते, सामाजिक कार्यकर्ते, एम के फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सागर सिमेंटचे महाराष्ट्राचे प्रमुख महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. प्रणिती शिंदे यांना खासदार करण्यासाठी त्यांनीही आपली ताकद दक्षिण मध्ये लावली. काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये महादेव कोगनुरे हे सुद्धा आहेत.
काडादी हे मैदानात आल्याने त्यांचाही अपेक्षाभंग झाला पण मागील अनेक वर्षापासून दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या सामाजिक कार्यातून ओळख निर्माण केलेले, युवक, महिला, शेतकरी, विद्यार्थी यांच्यासाठी कायमच सहकार्याची भावना दर्शवणारे कोगनुरे यांनी यंदा काही करून विधानसभा निवडणूक लढवायची असा चंग बांधला आहे.
मुंबईमध्ये महादेव कोगणुरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या भेटीचा फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. राज ठाकरे हे स्वतंत्र विधानसभा निवडणूक लढवणार असल्याने इतर पक्षातील इच्छुक त्या पक्षाकडे आकर्षिले जात आहेत. महादेव कोगनुरे यांची ही केवळ भेट होती की भविष्यात काँग्रेस कडून उमेदवारी न मिळाल्यास ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवडणूक लढवतात का? असा प्रश्न आता या भेटीने उपस्थित होत आहे. तोपर्यंत चर्चा तर होतच राहणार.