विजयाचा चौकार मारलेल्या देशमुखांसमोर महेश कोठे यांचे तगडे आव्हान ; मिलिंद थोबडे ‘बार’ उडवणार की…..
सोलापूर : सोलापूर मधील शहर उत्तर हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विशेष करून महाराष्ट्रात भाजपच्या विरोधात वातावरण असताना सुद्धा उत्तर मधून सुमारे 35000 चे मताधिक्य भारतीय जनता पार्टीला मिळाले.
त्यामुळे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांचे अजूनही या मतदारसंघावर असलेले वर्चस्व कायम दिसून आले. परंतु यावेळी त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टी मधीलच नेत्यांनी बंडाचे निशाण फडकवण्याचा निश्चय केला आहे.
त्यातच 2014 आणि 2019 या विधानसभेत एकतर्फी विजय मिळवणाऱ्या आमदार मालकांसमोर या मतदारसंघात 2009 ला तगडी फाईट दिलेल्या महेश कोठे हे तुतारी कडून उमेदवार असल्याने त्यांच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.
2019 च्या वेळी महाराष्ट्र गोवा बारा असोसिएशनचे अध्यक्ष एडवोकेट मिलिंद थोबडे हे इच्छुक होते पण त्यावेळी त्यांना थांबण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. यंदा थोबडे यांच्या सोबतच माजी महापौर शोभा बनशेट्टी, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, लिंगायत समाजातील चन्नवीर चिट्टे, जगदीश पाटील असे अनेक नेते इच्छुक आहेत. या सर्वांनी मोट पण बांधली आहे परंतु ऐनवेळी विजय देशमुख यांनाच पाठिंबा दिला जातो असे यापूर्वी दिसून आले आहे. त्यामुळे मिलिंद थोबडे यांचा ‘बार’ उडणार की सर्वच इच्छुक होणार ‘गार’ याकडेही राजकीय नजरा लागल्या आहेत.
यंदा राज्यात शरदचंद्र पवार यांच्या तुतारी कडे अनेकांचा कल पाहायला मिळत आहे. शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा पूर्वी काँग्रेसचा होता परंतु मागील दोन निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसने लढवल्या आहेत आणि त्यातच महेश कोठे शरदचंद्र पवार गटात असल्याने त्यांच्यासाठी हा मतदारसंघ महाविकास आघाडीतून सोडण्यात येणार आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेले पस्तीस हजाराचे मताधिक्य हे या मतदारसंघातील पद्मशाली समाजाने एक गठ्ठा मतदान दिल्याने मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पद्मशाली समाज विधानसभा निवडणुकीत महेश कोठे यांच्या पाठीशी राहणार का हेही महत्त्वाचे ठरणार आहे.