सोलापुरातील पत्रकारांनी मानले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार ; प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा सत्कार
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोलापुरातील पत्रकारांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी विशेष बाब म्हणून सात कोटी रुपये तातडीने मंजूर केले त्याबद्दल सोलापूर श्रमिक पत्रकार संघामध्ये अध्यक्ष विक्रम खेलबुडे आणि यासाठी प्रयत्न करणाऱ्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव करण्यात आला.
सोलापुरातील श्रमिक पत्रकारांसाठी विजापूर रोडला कंबर तलाव शेजारी गृहप्रकल्प उभा राहत आहे. हा निधी मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा असलेल्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांचा श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला परंतु खरे श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच द्यावे अशी विनंती वाघमारे यांनी पत्रकारांसमोर केली.
शासनाने काढलेल्या निर्णयामध्ये सिटी सर्वे नं. २३२ सोलापूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणामार्फत (म्हाडा) बांधण्यात येत असलेल्या १२६ अत्यल्प उत्पन्न गट व ११२ अल्प उत्पन्न गट गृह प्रकल्पाअंतर्गत सदनिका विशिष्ट गटासाठी देण्याबाबत कोणत्याही निर्णयास अद्याप शासन मान्यता देण्यात आलेली नाही. मात्र, सदर गृहप्रकल्प म्हाडा प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असल्याने, सदर प्रकल्पाच्या बाह्य सुविधांसाठी महाराष्ट्र निवारा निधीतून रुपये ७ कोटी (अक्षरी रुपये सात कोटी फक्त) इतका निधी म्हाडा प्राधिकरणास उपलब्ध करुन देण्यास यान्वये एक विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येत असल्याचे सांगितले आहे.