जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी जयसिंग आवताडे
वारणा उद्योग समूहाचे प्रमुख, माजी मंत्री आणि पन्हाळा-शाहूवाडी मतदारसंघाचे आमदार विनय कोरे संस्थापक असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सोलापूर जिल्हा संघटक पदी मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक येथील जयसिंग शिवाजीराव आवताडे यांची निवड करण्यात आली आहे. आमदार विनय कोरे यांच्या हस्ते आवताडे यांना निवडीचे पत्र देण्यात आले. यावेळी जेष्ठ नेते शिवानंद पाटील, डॉ. विश्वनाथ अक्कलवाडे उपस्थित होते.
विनय कोरे यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाने सोलापूर महानगरपालिकेत चार नगरसेवक निवडून आणले होते. या पक्षाला मानणारा मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून या पक्षाच्या संघटनात्मक निवडी झाल्या नव्हत्या. येणारी विधानसभा निवडणुक डोळ्यासमोर ठेऊन या पक्षाच्या संघटनात्मक निवडी करण्यात येत आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी जयसिंग आवताडे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.
जयसिंग आवताडे हे मोहोळ तालुक्यातील विरवडे बुद्रुक येथील रहिवासी आहेत. त्यांना संघटनात्मक राजकारणाचा मोठा अनुभव आहे. कामती जिल्हा परिषद मतदारसंघात त्यांचे मोठे संघटनात्मक काम आहे. याची दखल घेऊन आमदार विनय कोरे यांनी विधानसभा निकडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी आवताडे यांच्याकडे सोपविली आहे. आमदार विनय कोरे यांनी ज्या विश्वासाने माझ्यावर सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविली आहे तिला पक्षाची संघटनात्मक बांधणी करून न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जयसिंग आवताडे यांनी दिली.