देवेंद्र कोठेंसाठी चंद्रकांत गुडेवार यांची माघार ; ‘शहर मध्य’मध्ये राजकीय ट्विस्ट ; देवेंद्रंनी मानले या शब्दात आभार
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त निवृत्त वरिष्ठ चंद्रकांत गुडेवार हे सोलापूर शहर मध्य या मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असल्याच्या बातम्या लागल्या. गुडेवार हे पद्मशाली समाजाचे असल्याने आणि सोलापूर मध्ये त्यांच्या नावाचे वलय असल्याने त्यांची चांगली चर्चा झाली परंतु आता भाजपचे युवा नेते देवेंद्र कोठे यांच्यासाठी चंद्रकांत गुडेवार यांनी माघार घेत त्यांना पाठिंबा दिला आहे.
यानंतर देवेंद्र कोठे यांनी गुडेवार यांचे आभार मानत केलेली पोस्ट खालील प्रमाणे….
मोठी माणसं केवळ वयानं नाही, तर त्यांच्या अनुभवांतून, विचारांतून आणि कृतीतूनही मोठी बनतात, याची प्रचिती आज पुन्हा एकदा माजी आयुक्त आदरणीय चंद्रकांत गुडेवार साहेबांच्या निर्णयातून आली. गुडेवार साहेबांनी स्वतः शहर मध्य मधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, तो त्यांनी मागे घेत निवडणूक न लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. शहर मध्यसाठी माझ्या नावाला त्यांनी पाठिंबा दिला.
इतकच नाही तर इतरांनाही माझ्या नावाची शिफारस करण्यासाठी त्यांनी आवाहन केल्याचं ऐकून माझं मन भारावून गेलं आहे. माझ्या कर्तुत्वावर आणि कार्यपद्धतीवर त्यांनी विश्वास दाखवला याचा आनंद आहेच. त्यांच्या अनुभवांचा अमूल्य ठेवा, त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांचा आशीर्वाद मला पुढील वाटचालीसाठी एका अनमोल आधारा सारखा ठरणार आहे. साहेबांच्या या सहकार्यासाठी मी नतमस्तक आहे, आणि त्यांच्या विश्वासाचं चीज करण्यासाठी मी संपूर्ण प्रयत्न करेन, हे वचन देतो. शेवटी त्यांचा माझा हेतू एकच होता तो म्हणजे या मतदारसंघाचा आणि आपल्या सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यासाठी सदैव झटत राहीन याची ग्वाही देतो.
– देवेंद्र राजेश कोठे






















