दोन सिने अभिनेत्री गुरुवारी सोलापुरात ; वैद्य – राठोड जोडी जोरात
सोलापूर : श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त सोनाई फाऊंडेशन व स्वयंम शिक्षा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या दहीहंडी उत्सवात दहीहंडी फोडणाऱ्या संघास तब्बल ५ लाख एक रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार आहे. सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
गुरुवार २२ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जुळे सोलापूर येथील डी फार्मसी कॉलेज शेजारी असलेल्या भंडारी ग्राउंडवर दहीहंडी उत्सवाचा हा कार्यक्रम होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार राम सातपुते यांच्या हस्ते होणार आहे. तर आमदार आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याचबरोबर सिने अभिनेत्री संस्कृती बालगुडे आणि धनश्री काडगावकर यांचीही विशेष उपस्थिती या कार्यक्रमास असणार आहे.
सोनाई फाऊंडेशन व स्वयंम शिक्षा फाऊंडेशनच्या दहीहंडी उत्सवास सोलापूर शहर जिल्ह्यासह ठाणे, मुंबई, बारामती, पुणे येथील गोविंदा पथकदेखील येणार आहेत. ९ थरांच्या पथकास एक लाख रुपये, ८ थरांच्या पथकास ५० हजार रुपये तर सात थरांच्या पथकास २५ हजार रुपयांचे पारितोषिक सोनाई फाऊंडेशन व स्वयंम शिक्षा फाऊंडेशनतर्फे देण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस काशिनाथ भतगुणकी उपस्थित होते.
प्रथमच मोठी दहीहंडी
तब्बल ५ लाख रुपयांचे बक्षीस असलेली मोठी दहीहंडी प्रथमच सोलापुरात आयोजित केली जात आहे. सोनाई फाऊंडेशन व स्वयंम शिक्षा फाऊंडेशनने या दहीहंडी उत्सवाची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या दहीहंडी उत्सवात मोठ्या प्रमाणावर नागरिक सहभागी होणार आहेत. ९ थरांची दहीहंडी पाहण्यासाठी सोलापुरातील अबालवृद्धांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सोनाई फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष युवराज राठोड आणि स्वयंशिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केले आहे.