सोलापुरात निवासी डॉक्टरांचा कँडल मार्च ; पश्चिम बंगाल मधील घटनेचा निषेध
सोलापूर : महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने सोलापुरात कँडल मार्च काढून पश्चिम बंगाल मधील निवासी डॉक्टर हत्येच्या घटनेचा निषेध नोंदवला.
प. बंगालमधल्या एका शासकीय रूग्णालयातल्या महिला प्रशिक्षणार्थी निवासी डॉक्टरवर बलात्कार करून नंतर तिची हत्त्या करण्यात आल्याची घटना घडली होती. त्यानंतर निवासी डॉक्टरांच्या राष्ट्रव्यापी संघटनेने काल संप पुकारला होता. त्यानुसार काल देशभर निवासी डॉक्टरांनी संप पुकारला. त्यामध्ये महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना सोलापूर शाखा ही सहभागी झाली होती.
बुधवारी सायंकाळी निवासी डॉक्टरांनी रंगभवन चौक ते सिव्हील हॉस्पिटल असा मेणबती मोर्चा काढून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.
या मोर्चात सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ शेशान कांबळे, डॉ योगीराज करंबेलकर, डॉ विशाल जगदाळे, सरचिटणीस डॉ श्रुतिका भोईर, डॉ जयेश मेस्त्री, डॉ अदिती मांगे यांच्यासह डॉक्टर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.