दिलीप माने शेतकऱ्यांसह भेटले उजनी अधीक्षक अभियंत्यांना ; ही केली मागणी
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिणी उजनी धरण 100 टक्के भरले असून आता भीमा नदीत मोठ्या वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी आमदार दिलीप माने यांनी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह सोमवारी भीमा कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांची भेट घेतली.
प्रशासनाने पूर नियंत्रणाच्या दृष्टीने उजनी धरणातून सोडण्यात येणारे पाणी कॅनलच्या आणि सीना -भीमा जोडकालव्यातून वितरित करावे. जेणेकरून पाणी वितरिकेच्या माध्यमातून गावोगावचे पाझर तलाव, गाव तलाव, साठवण तलाव भरून घेता येतील. यामुळे शेतकऱ्याच्या विहीर, कुपनलिकाच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. शिवाय जिल्ह्यातील अनेक भागात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. त्याठिकाणच्या पाणी टंचाईच्या समस्या सुटण्यास मदत होणार आहे.
तरी जलसंपदा आणि पाटबंधारे विभागाने उजनी धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्याचे योग्य पद्धतीने वितरण करावे अशी मागणी करण्यात आली.
दरम्यान दिलीप माने यांनी माहिती देताना सांगितले की, प्रशासनासोबत अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून आमच्या मागण्यांनंतर लवकरच पाणी सोडण्यात येणार असल्याने यंदा शेतकऱ्यांना त्याचा पुरेपूर फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली.