महेश अण्णांचे अद्याप ठरेना ! ऐनवेळी शहर उत्तरमध्ये काँग्रेसचा कोण? मग हे आहेत संभाव्य चेहरे
सोलापूर : महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीने एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढवली. महाराष्ट्रात चांगले यश मिळाले. आता विधानसभा निवडणूक सुद्धा काँग्रेस, शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि उध्दव ठाकरे शिवसेना हे एकत्रित निवडणूक लढवणार हे निश्चित झाले आहे.
शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे खासदार झाल्याने तो मतदार संघ आता रिकामा झाला आहे. त्या मतदारसंघातून अनेक जण इच्छुक आहेत परंतु लोकसभा निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार आडम मास्तर यांना इंडिया आघाडीतून हा मतदारसंघ सुटण्याची शक्यता आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा मतदारसंघापैकी शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट हे चार यापूर्वी काँग्रेसला मिळायचे. आता तीन पक्षाची महाविकास आघाडी असल्याने जिल्ह्यातील माळशिरस, माढा, करमाळा, बार्शी तसेच पंढरपूर मंगळवेढा हे मतदारसंघ शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादीला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मोहोळ हा शिवसेना मागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्या शहर उत्तर या मतदारसंघाची मागणी भविष्यात काँग्रेस करू शकतो. पण काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी आपण आघाडी धर्म पाळणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.
महेश कोठे हे शहर उत्तर मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उभारणार असे बोलले जाते पण त्यांचे अजूनही काही ठरेना असे दिसते. मागील दोन निवडणुका या त्यांनी शहर मध्य मधून लढवल्या आहेत आणि सुमारे 33 हजार मते त्यांनी घेतली आहेत आणि आता प्रणिती शिंदे नसल्याने त्यांना उत्तर पेक्षा मध्य हा सेफ वाटत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा ऐकण्यास मिळते. अण्णा ऐनवेळी मध्य मध्ये गेले आणि शहर उत्तर काँग्रेसला सुटला तर तिथून कोण असा प्रश्न निश्चितच उपस्थित होणार.
शहर उत्तर मधून मराठा समाजातून सुनील रसाळे, लिंगायत समाजातून सुदीप चाकोते, वडार समाजातील सुशील बंदपट्टे, ब्राह्मण समाजातून राजन कामत यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. मागील काही वर्षांपासून काँग्रेस पक्षाने उत्तर कडे लक्ष दिले नाही. तसेच नवा चेहरा ही तयार करता आलेला नाही.
मराठा समाजाचे नेते, माजी शिक्षण सभापती सुनील रसाळे इच्छुकांमध्ये त्यांचेही नाव घ्यावे लागेल, त्यांचा या मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. रसाळे यांनी शिष्टमंडळ घेऊन सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेत उत्तर काँग्रेसला द्यावे अशी मागणी केली आहे.
लिंगायत समाजातून सुदीप चाकोते यांचेही नावं चर्चेत असते. त्यांच्याकडे युवा कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे, त्यांनी यापूर्वीही काँग्रेस वरिष्ठांकडे तशी इच्छा बोलून दाखवली आहे.
नव्या चेहऱ्यांबाबत सुशील बंदपट्टे यांनी बऱ्याच दिवसांपासून आपल्या भागात चांगली बांधणी केली आहे, महिलांचे अनेक मोठे मेळावे प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत घेतले, महिलांसाठी त्यांच्या कार्यालयात वेगवेगळ्या योजनांचा लाभ दिला जातो. लोकसभा निवडणुकीत वडार समाजाला एकत्र करून काँग्रेसला पाठिंबा देण्यात महत्वाची भूमिका त्यांनी बजावली.
ब्राह्मण समाजातून राजन कामत यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कडे ब्राह्मण समाजाच्या वतीने लेटर देऊन शहर उत्तर मधून विधानसभा निवडणुकीची मागणी केली आहे. यावरून ते इच्छुक असल्याचे स्पष्ट होते.
जर पक्षाने आतापासूनच एक नवा चेहरा तयार केला तर निश्चितच काँग्रेसला पुढील निवडणुका जड जाणार नाहीत. त्यासाठी पक्षाने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता असल्याचे कार्यकर्ते बोलत आहेत.