बापरे ! एवढी मोठी मगर ; दक्षिण तालुक्यात मगर दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराट
दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुरघोट गावच्या भीमा नदीच्या किनारी मोठी मगर दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.
कुरघोट येथे भीमा नदीकाठी मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास गवतावर ऊन खात पडलेली भली मोठी मगर दिसली. ही मगर गावातील संगमेश कांबळे यांना दिसले आहे.
उजनी धरणातून सोलापूर शहरासाठी भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात आलेले आहे त्यामुळे सध्या टाकळी ते कुरघोट व औज बंधारा दरम्यान नदीचे दोन्ही काठ पाण्याने पूर्णपणे भरलेले आहेत. नदीकाठी गट क्रमांक ६० मध्ये म्हैस चारण्यासाठी गेलेल्या संगमेश यल्लमा कांबळे या तरुणास मगरीचे दर्शन झाले. त्याने लांबूनच मोबाइलमध्ये फोटो काढले. त्याने लगेच गावचे सरपंच बनसिद्द बन्ने, आपले मित्र आणि गावकऱ्यांना कळवले आहे.