सोलापूर झेडपीचे कास्ट्राईब नेते अरुण क्षीरसागर यांचा शनिवारी सेवापूर्ती गुणगौरव सोहळा ; तब्बल 39 वर्ष दीर्घ सेवा
सोलापूर : कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष अरुण क्षिरसागर हे येत्या 31 मे रोजी 39 वर्षाच्या दीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होत आहेत. त्या सेवापूर्ती बद्दल गुणगौरव समिती जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या वतीने क्षिरसागर यांच्या सेवापूर्ती गुणगौरव समारंभ जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या हस्ते शनिवार 01 जून रोजी सकाळी 11.30 वाजता. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे आयोजित केला असल्याची माहिती गुणगौरव समिती अध्यक्ष चंद्रकांत होळकर यांनी दिली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभुषण पुरस्कार सन्मानित नामदेवराव कांबळे व प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे उपस्थित राहणार असून प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेचे आजी माजी वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
संघटनेच्या वतीने अरुण भाऊ यांचा सपत्नीक सेवा गौरव सन्मान पत्र देवून भव्य सत्कार करण्यात येणार आहे. तसेच अरुणभाऊ यांच्या कार्याचा गुणगौरव विशेष अंकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
8 डिसेंबर 1984 रोजी जिल्हा परिषदेच्या सेवेत ते परिचर म्हणून पंढरपूर तालुक्यात आयुर्वेदिक दवाखाना शेळवे येथे सेवेत रुजू झाले. कोंडी प्राथमिक आरोग्य केंद्र, अर्थ विभाग, पशुसंवर्धन विभागात त्यांनी सेवा बजावली आहे. सर्वाधिक सेवा ही पशुसंवर्धन विभागात झाली आहे. त्यांनी शेकापचे दिवंगत नेते बाबा कारंडे यांच्याकडून चळवळीचे धडे घेतले, 2007 ला जिल्हा परिषदेमध्ये कास्ट्राइब कर्मचारी संघटनेची स्थापना केली. संघटनेचे राज्य अध्यक्ष कृष्णा इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी चळवळ उभी केली.