सोलापुरात फिल्मी स्टाईलने फसवणूक ; लग्नाच्या नावाखाली सव्वा तीन लाखाला लावला चुना
मोहोळ : विवाह योग्य वधूच्या शोधात असलेल्या वराचा विवाह करुन देतो, अशी थाप मारत ‘ठकसेनी’ टोळीनं खोटा विवाह करुन देऊन एका कुटुंबाची ३, २१,००० रुपयांची फसवणूक केलीय. ही मजेशीर घटना मोहोळ तालुक्यात एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात घडलीय. ही टोळी तो कित्ता गिरवत आणखी एका कुटुंबाला ‘चुना’ लावण्याच्या प्रयत्नात असताना त्यांना पोलीसांना कळवून शनिवारी, २५ मे रोजी फसलेल्या कुटुंबानं मोहोळ पोलिसांच्या स्वाधीन केलंय. या फसवणूक प्रकरणी ०६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या घटनेची पार्श्वभूमी अशी की, मोहोळ तालुक्यातील सचिन नावाचा तरुण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीत वायरमन म्हणून काम करीत आहे, त्याच्या विवाह विचार करून ते कुटुंबीय त्यास वधू शोधत होते, तो तिशीकडे वाटचाल करीत असूनही त्याचे लग्न जमत नव्हते. त्यामुळं त्याच्या भावानं मावस भावाकडं एखादं स्थळ बघण्यास सांगितलं होतं.
त्याने लग्न जमविणारा नांदेड जिल्ह्यातील एजंट गंगाधर लाडबा ढेरे (रा. कोळेगांव (बु) ता. भोकर) याचा संपर्क नंबर दिला. त्यांनी त्यास संपर्क साधल्यावर त्यानं मुलगी उपलब्ध आहे, परंतु तिच्याबरोबर लग्न जमले तर तुम्हांला रोख रक्कम २, ५०, ००० रुपये आणि गाडी भाड्यापोटी रक्कम रुपये ११, ००० रुपये असे एकूण २, ६१, ००० रुपये द्यावे लागतील, अशी अट घालून त्यांनी मोबाईल व्हॉटस्अॅपवर मुलीचे फोटो पाठवून दिले. इथूनच ‘ लग्नासाठी काय पण ‘ या नाट्यास प्रारंभ झाला.
वधूच्या शोधात असलेल्या घरातील सर्वांनी चर्चा करुन मुलगी पसंत आहे, असे सांगून ते त्यांना अटी नुसार ठरलेली रक्कम देण्यास तयार झाले. त्याप्रमाणे ०२ एप्रिल २०२४ रोजी मुलगी विशाखा व तिचा भाऊजी शौलेश, मावशी म्हणून निर्मला, महिला एजंट लता पदक व त्यांचे सोबत अनोळखी दोन महिला हे सर्वजण चारचाकी गाडी करुन विवाहोत्सुक मुलाच्या गांवी दुपारी आले. त्यांनी मुलीचा विशाखा श्रीकृष्ण छापानी (रा. नया अकोला) असा परिचय दिला.
त्यानंतर बोहल्यावर चढण्याची घाई असलेल्या नवऱ्या मुलाच्या घरी नातेवाईक व घरातील लोकांची बैठक झाली. त्यांना ठरल्याप्रमाणे रोख रक्कम देण्याचे व तसेच त्याच दिवशी लग्न करण्याचे ठरले. त्याप्रमाणे ०२ एप्रिल रोजी महिला एजंट लता पदक हिचे सांगण्यावरुन तिच्या फोन पे वर वेगवेगळ्या अकाउंट नंबरवरून २, ४१, ००० रूपयांची रक्कम वधू पक्षाला दिली.
अटीप्रमाणे ठरलेली रक्कम मिळाल्यावरच त्यांनी त्याच दिवशी ०२ एप्रिल २०२४ रोजी सायंकाळी ०६.३० वा. चे सुमारास मौजे देगांव (वा) येथे नवरा मुलाच्या राहते घरी घरगुती पध्दतीने लग्र पार पडले. त्यानंतर पाहुणचार झालेनंतर तिचे सोबत आलेले नातेवाईक रात्री विशाखाला सासरी सोडून परतीच्या वाटेला लागले.
१० एप्रिल रोजी विशाखा हिचे कथित भाऊजी शैलेश यांने, त्यांचे घरी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असून विशाखाला घेऊन या व लगेच कार्यक्रम संपल्यावर परत माघारी घेऊन जा, असं म्हटले. तिचे सासरे घरच्या लक्ष्मी, विशाखाला सोबत घेऊन, १३ एप्रिल रोजी रात्रौ सोलापूर येथून खुराणा ट्रॅव्हन्सने बसून दुसऱ्या दिवशी सकाळी नागपूर हायवेवर उतरले. त्यावेळी तेथे विशाखाचा भाऊजी शौलेश हा आला होता.
त्याने त्या दोघांना रिक्षा करुन अकोला बस स्टॅण्डवर नेले. तेथे स्टॅण्डवर विशाखा ही वडीलांना मला बाथरुमला जायचे आहे, असे सांगून तेथून निघून गेली. त्यावेळी तिचा भाऊजी शौलेश हा आपल्याला घरी जाण्यासाठी बाहेर गाडी येणार आहे, ती आली का बघून येतो, म्हणून गेला, तो परत आलाच नाही. सून विशाखाचा अकोला स्टॅण्ड परिसरात व आजूबाजूला शोध घेतला, परंतु ती ही मिळून आली नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यावर आठवड्याच्या सासऱ्यानं गांव गाठलं.
नववधू विशाखा घरातून जाताना, तिच्या अंगावर सोन्याचे दागिने फुले-झुबे व मंगळसूत्र असे दोन्ही मिळून एक तोळा सोने व चांदीचे पैंजन ७० ग्रॅम, पायातील जोडवी २० ग्रॅम असे दागिने एकूण किंमत ५३, ००० रुपयांचे व घरात ठेवलेली रोख रक्कम २७, ००० रुपये (अक्षरी सत्तावीस हजार रुपये) घेऊन गेल्याचे स्पष्ट झालंय. त्या महिलांचा आम्ही आजपावेतो शोध घेतला, परंतु त्यांच्याबाबत काही माहिती मिळाली नाही, अगर त्या मिळून आल्या नाहीत.
भोसले परिवाराची फसवणूक केलेल्या महिला मोहोळ तालुक्यातील पेनूर येथील नक्षत्र मंगल कार्यालय येथे उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडीच्या भोसलेला ‘ चुना ‘ लावण्याच्या प्रयत्नात असल्याचे अगोदर फसलेले भोसले परिवारानं नक्षत्र मंगल कार्यालयात धडक मारली.
तिथं ती टोळी असल्याचे दृष्टीस येताच हा प्रकार, शनिवारी २५ मे रोजी पोलिसांना कळवून त्यांना पोलीस ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर भोसलेनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार मोहोळ पोलिसांनी विशाखा श्रीकृष्ण छापानी (रा. नया अकोला, अमरावती), तिचा भाऊजी शौलेश (पूर्ण नांव पत्ता नाहित नाही), मावशी निर्मला बावीस्कर (रा. उल्हासनगर), महिला एजंट लता पदक (रा. राजोरा, संभाजीनगर), पिंकी अशोक ढवळे (रा. उल्हासनगर) आणि लता धनराज चव्हाण रा. डोंबीवली जि. ठाणे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार/७०९ आदलिंगे या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.