सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची
सोमवारी महासभा ; एक लाख लोकांसाठी बसण्याची व्यवस्था ; असे आहे नियोजन
सोलापूर : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा झंजावाती प्रचार सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवार 29 एप्रिल रोजी दुपारी 12 वाजता सोलापुरात होम मैदानावर भव्य सभा होणार आहे. त्यासाठी नेटकी व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती भाजप सोलापूर लोकसभा विभाग निवडणूक प्रमुख शहाजी पवार यांनी दिली.
या सभेसाठी होम मैदानावर नेटकी व्यवस्था करण्यात आली आहे. या सभेस येणारे नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांना कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा गैरसोय होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. लोकांची प्रचंड गर्दी होणार असल्याने सुमारे 80 हजार ते एक लाख लोकांची बैठक व्यवस्था करण्यात येत आहे. भर दुपारी सभा असल्याने लोकांना रखरखत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी सर्व लोक सावलीमध्येच बसतील याची काळजी घेण्यात येत आहे. ही सभा यशस्वी करण्यासाठी विविध कमिटीच्या माध्यमातून भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या हिताचे भाषण ऐकण्यासाठी सोलापुरातील नागरिक, महिला, शेतकरी, कार्यकर्ते, उद्योजक यांनी या सभेला वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीच्यावतीने पवार यांनी केले आहे.
महिलांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था
सभेच्या ठिकाणी महिलांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सर्वांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येत आहे.
नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय व्यवस्था आणि आपत्कालीन व्यवस्थाही तैनात करण्यात येणार आहे.
शहाजी पवार
निवडणूक प्रमुख