सोलापूरच्या लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया आजपासून सुरुवात ; अर्ज दाखल करण्यास पाच जणांना परवानगी, पोलिसांचा असा आहे बंदोबस्त
सोलापूर जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी १२ एप्रिल २०२४ रोजी अधिसूचना जाहीर होईल, उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख १९ एप्रिल २०२४ असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख २२ एप्रिल २०२४, मतदानाची तारीख ७ मे २०२४ तर मतमोजणी ४ जून २०२४ रोजी होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी दिली.
सोलापूर : सोलापूर आणि माढा येथील लोकसभा निवडणूक २०२४ साठी निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, शुक्रवार दि. १२ एप्रिल ते १९ एप्रिलपर्यंत उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार असून, २२ एप्रिल २०२४ रोजी अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. ७ मे रोजी मतदान तर ४ जूनला मंतमोजणी होणार आहे.
सोलापूर व माढा लोकसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया आजपासून सुरु होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना राजकीय पक्षाच्या उमेदवारांसोबत कमाल ५ जणांना प्रवेश दिला जाणार आहे.
उमेदवारांना अर्ज दाखल करण्यासाठी येत कार्यालय पसिरात तीन वाहने आणता येतील. जिल्हाधिकारी कार्यालय व परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. सातरस्ता शासकीय दूध डेअरी येथील नवीन जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील १०० मीटर अंतर सर्वसामान्यांना रहदारीसाठी निबंध असणार आहेत. जिल्हा प्रशासनाची पूर्ण तयारी झाली आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, तर माढा मतदार संघासाठी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास १९ एप्रिल शेवटची तारीख असून या दिवशी गर्दी होण्याची शक्यता आहे.
तर २२ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. या दोन्ही मतदारसंघासाठी सात मे रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यात मतदानासाठी एकूण ३ हजार ६१७ मतदान केंद्रे आहेत. तसेच ३ हजार ५९९ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत. जिल्ह्यामध्ये एकूण २७ म तदान केंद्रे संवेदनशील आहेत.
युवा मतदारांचा टक्का वाढला आहे जिल्ह्यात एकूण ११ विधानसभा मतदार संघ आहेत, त्यात एकूण पुरुष मतदार १८ लाख ७६ हजार ४९८, स्त्री मतदार १७ लाख ५० हजार २९७ व इतर मतदार २८० असे एकूण ३६ लाख २७ हजार ७५ एवढे मतदार व ४ हजार ५१९ सैनिक मतदार आहेत. यामध्ये १८-१९ वयोगटातील मतदारांची संख्या जवळपास ५२ हजार ७८३ असून २०-२१ वयोगटातील मतदार हे ७ लाख १२ हजार १४७ इतके आहेत. पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या नेतृत्वाखाली १०० पोलिसांचा बंदोबस्त आहे. सोलापूरसाठी तीन पोलीस निरीक्षक, सहा पोलीस उपनिरीक्षक, ४४ पुरुष कर्मचारी, १० महिला कर्मचारी आणि आरसीबीचे एक पथक तैनात राहणार आहे तर माढ्यासाठी दोन पोलीस निरीक्षक पाच पोलीस उपनिरीक्षक ३९ पोलीस कर्मचारी महिला कर्मचारी आणि एक आरसीपी पथक असे तैनात करण्यात आले आहेत.