भाजपला अक्कलकोट मतदारसंघात धक्का ; सोलापूर लोकसभा भाजपचे इच्छुक उमेदवार काँग्रेस पक्षात दाखल
सोलापूर : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीला धक्का बसला असून बक्षी हिप्परगे या गावचे सरपंच प्राध्यापक विश्रांत गायकवाड यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्रांत गायकवाड यांनी गळ्यात काँग्रेसचा शेला घातला, यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, दक्षिणचे नेते सुरेश हसापुरे, अशोक देवकते, संजय हेमगड्डी, बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राध्यापक विश्रांत गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टी कडून लोकसभा उमेदवारीची मागणी केली होती. त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यांचे बंधू दिवंगत नेते डी एन गायकवाड हे दक्षिण तालुक्यातील आंबेडकर समाजातील मोठे नेते म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या मृत्यूनंतर प्राध्यापक विश्रांत गायकवाड हे बक्षी हिप्परगे गावचे सरपंच झाले. गायकवाड यांनी भाजपकडून बाजार समितीची निवडणूक लढवली होती. विश्रांत गायकवाड हे काँग्रेसमध्ये आल्याने दक्षिण अक्कलकोट भागातील आंबेडकर समाजाच्या मतांचा फायदा काँग्रेसला होण्याची शक्यता आहे.