सोलापूर : दक्षिण सोलापूर पंचायत समितीची आमसभा सोमवारी या मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेमध्ये होटगी ग्रामपंचायत सदस्य इंद्रजीत लांडगे यांनी आपल्या भागातील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावर प्रकाश टाकला.
लांडगे म्हणाले, तालुक्यातील होटगी गावाच्या परिसरात झालेले साखर कारखाने, सिमेंट फॅक्टरी आणि मोठा एनटीपीसी प्रकल्प यामुळे जड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे होटगी परिसरातील रस्ता वारंवार खराब होत असून किती वेळा दुरुस्त करण्याची मागणी करायची? एक तर रस्ता दुपदरी करा अन्यथा ती जड वाहतूक आहेरवाडी, सिंदखेड मार्गे सोलापूर विजापूर महामार्गाकडे वळवा अशी मागणी केली.
यावेळी सभेला उपस्थित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी हा प्रश्न गंभीर असून त्यावर प्रशासन मार्ग काढत असल्याचे सांगितले.

















