सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेची शेवटची आणि अर्थसंकल्पीय सभा शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाली. या सभेला सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने सर्व पदाधिकारी, अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य व पत्रकार यांना फेटे बांधण्यात आले.
सभापती विजयराज डोंगरे यांच्या कडून बजेट सादर झाल्यानंतर माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी सामान्य प्रशासन विभागाला मजेशीरपणे फेटे बांधल्यावरून चिमटे काढले. काही सदस्यांना पांढरे तर काही सदस्यांना हिरव्या रंगाचे फेटे तर पत्रकार भडक लिहितात म्हणून त्यांना भडक भगवे फेटे बांधले. डायसवर बसलेले सर्व पदाधिकारी वेगवेगळ्या पक्षाचे असल्याने त्यांना वेगवेगळ्या कलरचे फेटे असे म्हणून त्यांनी प्रशासनाला खेचण्याचा प्रयत्न केला.
या नंतर जेव्हा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी बजेटवर आपले भाष्य करताना मल्लिकार्जुन पाटील यांच्या वक्तव्यावर “हे मानाचे फेटे होते, आम्ही तुम्हाला टोप्या घातल्या नाहीत” असे म्हणताच उपस्थित सभागृहात हशा पिकला…
तसेच मदन दराडे यांनी माझी जिल्हा परिषद, माझी जबाबदारी अशा भूमिकेतून स्वामी यांनी काम करावे अशी मागणी केली होती त्यावर सुद्धा स्वामी यांनी भाष्य केले, कुठल्याही राजकीय पक्षाने अडथळा जर नाही आणला तर प्रशासन अतिशय चांगल्या पद्धतीने येणारे काही महिने प्रशासक काळात काम करेल असेही त्यांनी सांगितले.
















