नातेपुते ता.२(प्रतिनिधी ) महाद्या धाव – महाद्या धाव अशी आर्त हाक देत, अतिशय उत्साही अन रोमहर्षक वातावरणात मुंगी घाटातून कावडी चढविण्याचा सोहळा आज लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला.
श्री संत भुतोजी बुवा तेली उर्फ तेल्या भुत्याची कावड व इतर शेकडो मानाच्या कावडी आज कोथळे ता. माळशिरस येथील अतिशय अवघड व लहान असणाऱ्या मुंगी घाटातून मानवी साखळी करून सायंकाळी सात वाजता शिखर शिंगणापूरला पोहोचल्या. यावेळी हजारो भाविक स्वागतास उभे होते.
महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवरायांचे कुलदैवत असणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची वार्षिक यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू आहे. रविवार चैत्र शुद्ध द्वादशी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. महाराष्ट्रांतून आलेल्या हजारो कावडीने जलाभिषेक करून शंभू महादेवाचे दर्शन घेतले. तेल्या भुताच्या कावडीने दुपारी तीन वाजता कोथळे येथे आगमन झाले. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी दिलीप स्वामी, पुरंदरचे आमदार संजय जगताप, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ बसवराज शिवपुजे, प्रभारी तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप, अप्पर तहसीलदार अजिंक्य घोडगे, सपोनि प्रविण संपांगे यांनी स्वागत करून पूजन केले. यावेळी कोथळेच्या सरपंच वर्षा गुरव, उपसरपंच तानाजी किसवे, श्री शंकर कारखान्याचे संचालक चंद्रकांत शिंदे, प्रताप पाटील, शोभा साठे उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सहकुटुंब सोहळा अनुभवला यावेळी त्यांनी भक्तांच्या मूलभूत सुविधांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून यात्रा निधीसाठी पाच लाख देण्याची घोषणा केली.
इतर कावडी दुपारपासून मुंगी घाटातून मार्गस्थ होत होत्या. मानाच्या तेल्या भुत्याच्या कावडीची पहिली आरती पाच वाजता झाली. कावड पाच वाजून दहा मिनिटांनी घाटाच्या पायथ्याला आली. यावेळी अंदरुड ता. फलटण येथील वाटाड्याची मानाची कावड सोबत होती. ६.३०वा. कावडीची मानकर्यांच्या हस्ते आरती होऊन कावड घाटाला लागली. यावेळी फटाक्याची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली.
हर हर महादेव, महाद्या धाव महाद्या धाव अशा घोषणा दरी कपारीतून घुमत होत्या. अतिशय अवघड व जिंकरीचा असणारा हा घाट अतिशय शिस्तीत मानवी साखळीने भक्त पार करीत होते. सासवड परिसरातील लोकांच्या बरोबरीनेच कन्हेर, कोथळे ता.माळशिरस येथील शेकडो तरुण कावडीला घाट चढण्यासाठी मदत करत होते. अवघड टप्पे पार करीत असताना खालून भाविक टाळ्या वाजवून घोषणा देत कावडी धारकांना प्रोत्साहन देत होते.
सायंकाळी ८.१५ वाजता कावड शिखर शिंगणापूरला पोहोचली. यावेळी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, राजमाता कल्पना राजे भोसले, विविध खात्यांचे अधिकारी, तहसीलदार, सरपंच पुजारी बडवे, मानकरी यांनी स्वागत केले.
रणरणत्या उन्हात सकाळ पासून लाखो भाविक कावडी चढविण्याचा सोहळा पाहण्यासाठी जागा मिळेल तेथे बसून होते. भक्ती आणि शक्तीचा अनोखा थरार अनुभवायला आज मुंगी घाटात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक आले होते. पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, चार फौजदार, सत्तर पोलिस कर्मचारी, खाजगी बारा कमांडो यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते व ग्रामसेवक रवींद्र पवार,अनिता बलाक्षे वाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका सकाळ पासून हजर होत्या. सोलापूर सोबत सातारा जिल्ह्यातील रुग्णवाहिका तैनात होत्या.