सोलापूर : सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील उत्तर सोलापूर तालुका हा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते काका साठे आणि माजी आमदार दिलीप माने यांच्याच नावाने ओळखला जातो. काका आणि मालक एकत्र असले की कार्यकर्त्यांच्या उत्साहाला पारावार नसतो मात्र, ते जर एकमेकाच्या विरोधात गेले तर कायमच ‘काटे की टक्कर’ पाहायला मिळते.
सध्या हे दोन्ही नेते एकमेकांवर दुखावलेले आहेत मिळेल त्या कार्यक्रमात एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहेत. उत्तर सोलापूरच्या सभापती रजनी भडकुंबे यांचे वडील संभाजी भडकुंबे यांच्या होनसळ येथील शिक्षण संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिलीप माने यांनी त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या उत्तर पंचायत समितीचे तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी समाधान नागणे यांना उद्देशून आणि मजेदारपणे तुम्ही वडाळयाचे भावी जिल्हा परिषद सदस्य आहात असे वक्तव्य केले.
त्यावरून नागणे यांना भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणणे निश्चितच काकांना सहन झाले नाही. तो राग त्यांनी नागणे यांच्यावरही काढल्याची माहिती समोर आली आहे. एवढ्यावरच न थांबता काकांच्या आजूबाजूला लुडबुड करणाऱ्या आणि त्यांचा वयोवृद्धपणा पाहून कान भरणाऱ्या कार्यकर्त्यांनी मालक आणि काका मध्ये कशी अजून आग लावता येईल याचे पुरेपूर प्रयत्न केल्याची चर्चा काकांच्याच जवळ असलेल्यामध्ये ऐकण्यास मिळाली.
काकांनीच बाजार समितीच्या निवडणुकीत 440 चा झटका देऊन पराभूत केलेल्या कंपनीला हाताशी धरून थेट उत्तर सभापतीच्या विरोधात अविश्वास ठराव आणला. त्या दिवशी पूर्वनियोजित कट करून संभाजी भडकुंबे यांच्यावर हल्ला सुद्धा केला, मात्र कुणाला कशा पद्धतीने शह द्यायचा हे दिलीप मानेंना चांगलेच ठाऊक आहे आणि न्यायालयीन लढाईत ते कोणालाच ऐकत नाहीत हे खुद्द काका साठे यांनी बाजार समितीच्या निवडणुकीवेळी माध्यमांना सांगितले होते आणि झाले तसेच.
सभापतीवर अविश्वास ठराव आणून ही या निवडीला उच्च न्यायालयातून स्थगिती आणली. वडाळा मध्ये झालेल्या एका कार्यक्रमात काका साठे यांनी दिलीप माने यांच्यावर नाव न घेता टीका केली, राजकीय स्थिरता नसलेले लोक म्हणून नकळत डिवचले होते. या एकूणच सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उत्तरच्या सभापती रजनी भडकुंबे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हगलुर गावांमध्ये दिलीप माने यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरी सत्कार समारंभाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमाचा योगायोग म्हणजे या वाढदिवसानिमित्त झालेल्या क्रिकेट स्पर्धेत हगलुर गावाने वडाळा गावाला अंतिम सामन्यात हरवले हाच धागा धरून माने यांनी आपल्या भाषणात काय योग आहे पहा,, हगलुर गावाने वडाळ्याला हरवले मात्र काही जण समोर येऊन वार न करता पाठीमागून जाणीवपूर्वक माझ्या समर्थक, अधिकारी आणि कार्यकर्त्यांना त्रास दिला जातोय हिंमत असेल तर थेट वार करा मी सगळ्या बाजूने खंबीर आहे अशा शब्दात त्यांनी तालुक्यातील विरोधकांना एक प्रकारे चॅलेंज दिले, हे शब्द उच्चारताच उपस्थित हजारो नागरिकांमधून टाळ्या आणि शिट्ट्या चा कडकडात झाला.


















