सोलापूर : सोलापूर जिल्हा हा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, परंतु जिल्ह्यात सध्या भारतीय जनता पार्टी एक नंबरवर आहे. अशातच महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले त्यातही काँग्रेस तिसऱ्या नंबरवर आहे.
यापूर्वी सोलापूर जिल्ह्यात बार्शी, पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, शहर मध्य या ठिकाणी काँग्रेसचे आमदार निवडून यायचे. त्यामध्ये शहर-मध्य सोडता दक्षिण सोलापूर हा तर हक्काचा मतदारसंघ आणि बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मात्र या तालुक्यातील काँग्रेस नाममात्र होत चालल्याचे चित्र आहे.
पूर्वी आनंदराव देवकते, दिलीप माने, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, गुरु म्हेत्रे, उमाकांत राठोड, भीमाशंकर जमादार, हरीश पाटील असे दिग्गज नेते काँग्रेसमध्ये होते मात्र त्यापैकी बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार, हरीश पाटील असे बोटावर मोजण्याइतकी नेते मंडळी दक्षिणमध्ये सक्रिय आहेत पण काँग्रेसला त्यांचा कितपत फायदा होतो हा संशोधनाचा विषय आहे.
सध्या दक्षिण सोलापूर तालुक्यात काँग्रेसचा चेहरा म्हणून सुरेश हसापुरे यांची ओळख निर्माण होत आहे. त्यांच्याकडे सध्या कोणतेही पद नाही असे असतानाही हसापुरे यांनी तालुक्यातील किमान साठ विकास कार्यकारी सोसायट्यांवर आपली सत्ता कायम राखली आहे. या सोसायटी विजयाच्या अडून त्यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये काँग्रेस आणखीच मजबूत केल्याचं पहायला मिळते. या सर्व सोसायटीच्या संचालकांचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन हसापुरे यांनी आपल्या वाढदिवसादिवशी 29 मे रोजी केले होते.
या कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष प्रणिती शिंदे, यांच्यासह माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी अर्थ व बांधकाम सभापती विजयराज डोंगरे या प्रमुख नेत्यांना निमंत्रण देण्यात आले होते.
कार्यक्रम जुळे सोलापुरातील टाकळीकर मंगल कार्यालय या ठिकाणी होता. कार्यक्रमाची वेळ सकाळी दहाची होती परंतु साडे नऊ वाजल्यापासूनच सोसायटी संचालक आणि हसापुरे समर्थकांनी टाकळीकर हॉल भरभरून गेला होता या कार्यक्रमाला दक्षिण मधला एकही प्रमुख नेता नव्हता त्यांना सोडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं तरीही हजारोच्या संख्येने हसापुरे समर्थक कार्यक्रमाला उपस्थित होते.
मंगल कार्यालय खचाखच भरले होते, हॉलच्या बाहेर सुद्धा शेकडो कार्यकर्ते थांबून होते हॉलमध्ये सुमारे दीडशे ते दोनशे लोकांनी थांबून कार्यक्रम पाहिला. यावरून हसापुरे यांच्यावर प्रेम करणारा वर्ग किती मोठा आहे याची प्रचिती रविवारी सर्वांना आली. एकीकडे सोलापुरातील काँग्रेसचे कार्यक्रम पाहिले तर दोन चारशे लोकांची गर्दी जमायला नाकीनऊ येते.
मात्र हसापुरे यांच्या कार्यक्रमाची गर्दी पाहता अजूनही काँग्रेसला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. निश्चितच काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे या दोन नेत्यांपैकी एक जण तरी या कार्यक्रमाला हवे होते. स्वतः हसापुरे यांनी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्या अनुपस्थिती बाबत उपस्थितांसमोर दिलगिरी व्यक्त करत त्यांच्या न येण्याचे कारण सांगितले. एकूणच चांगला कार्यक्रम या दोन दिग्गज नेत्यांनी मिस केला अशी चर्चा कार्यक्रमस्थळी रंगली होती.


















