सोलापूर : भाजपची सत्ता सोलापूर महापालिकेत आली आणि लोकांच्या तोंडचं पाणी पळवलं, स्मार्ट सिटी आली, फंड आला मग सोलापूर शहराचा विकास का होत नाही. विकास झाला तो केवळ होम मैदानाचा सुभाष देशमुखांनी सैफुलच्या पुढं तर विजयकुमार देशमुखांनी पुणे नाक्याच्या पुढं सोलापूर नेलं नाही, आता तुमचे जहाज बुडणार आहे, तुमचा पक्ष तडीपार होणार आहे अशा शब्दात माजी महापौर मनोहर सपाटे यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
भाजप नेते बिज्जू प्रधाने यांच्या प्रवेश कार्यक्रमात माजी महापौर मनोहर सपाटे बोलत होते, भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह महापालिकेतील सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
भाजपच्या जहाजेला एक छिद्र पडलं आहे, ते जहाज बुडणार आहे, त्या छिद्राचं नाव आहे, बिज्जू प्रधाने. तो कार्यकर्ता असा आहे त्याने भाजप वाढवण्यासाठी काम केले, केवळ 84 मतांनी पडलेल्या कार्यकर्त्याला जर उमेदवारी दिली जात नाही तर तो पवार इज पॉवर ओळखून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करत आहेत. आता भाजप सोलापुरातून तडीपार होणार आहे.
काँग्रेस-शिवसेनेची किंवा राष्ट्रवादी-शिवसेनेव्ही युती होईल असे वाटले होते का ? पण ती किमया शरद पवार या माणसाने करून दाखवली, माझे पुरुषोत्तम बरडे यांचे कुठे जमत नव्हते, हाणामाऱ्या व्हायच्या, महेश कोठे मी कायम शत्रू त्यांनी तर माझ्यावर 18 गुन्हे दाखल केले पण शरद पवारांचा फोन आला मनोहर काय अडचण आहे, महेश कोठे यांना प्रवेश देतोय, मी काय बोलणार माझ्या राजकारणाची सुरुवात शरद पवार अन् शेवटही शरद पवारच…,मला पक्ष सोडण्याची गरज नाही.
















