सोलापूर : सोलापूर विकास मंचच्या वतीने मागील सहा दिवसांपासून होटगी रोड विमानतळावरुन विमानसेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी चक्री उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय स्तरावर याप्रकरणी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात ऑनलाईन मीटिंग लावण्यात आली होती.
या बैठकीत सोलापूरसह संपूर्ण राज्यभरातील प्रमुख शहरातील विमानतळाच्या प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीला मुख्यमंत्री कार्यालयाचे वॉर रूमचे महासंचालक राधेकृष्ण मोपलवार, सोलापुरातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महानगरपालिका आयुक्त पी शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया सोलापूर व्यवस्थापक चांपला यांची उपस्थिती होती.
बैठकीनंतर मिळालेल्या माहितीनुसार मोपलवार यांनी सोलापूर विमानतळाची माहिती घेतली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सध्याची वस्तुस्थिती सांगितली. दरम्यानच्या काळात एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला सर्वे करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तो सर्व्हे अध्यापही झालेला नसल्याचे निदर्शनास आले.
विमानसेवा सुरू करण्यात सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची ‘चिमणी’ असल्याचे समोर आले. तेव्हा मोपलवार यांनी सोलापूर विमानतळाची सध्याच्या वस्तुस्थितीचा अहवाल तातडीने सादर करण्याचे सूचना दिल्याचे समजले. राधेकृष्ण मोपलवार यांनी या विषयात लक्ष घातल्याने कामाला निश्चित गती मिळेल अशी अपेक्षा खुद्द अधिकाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.


















