सोलापूर : राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे एकेकाळची राष्ट्रवादी काँग्रेसची धडाडती तोफ. मात्र राजकारण अशा वाटेला आलं की त्यांना राष्ट्रवादीचं घड्याळ आपल्या हातातून उतरवावं लागलं. राजकीय परिस्थिती आणि आपल्या गोतावळयाचा विचार करत ढोबळे सरांनी भाजपचे कमळ हाती घेतले.
ढोबळे सर सध्या भाजपमध्ये चांगलेच रमले आहेत. आयुष्याचा शेवट सुद्धा भाजप मध्येच व्हावा असे ते कायम बोलत असतात. प्राध्यापक लक्ष्मणराव ढोबळे म्हणजे सध्या भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते झाल्याचे चित्र आहे. राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर ढोबळे सरांची कायम तोफ असते.
राष्ट्रवादीच्या नेत्यावर तोंडसुख घेण्याची संधी ढोबळे कधीच सोडत नाहीत. भारतीय जनता पार्टी सोबतच बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून त्यांची वाटचाल सुरू आहे. सरांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे जावई प्राध्यापक अब्राहम आवळे यांनी इचलकरंजीहून येत सोलापुरात शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केलं होतं.
लक्ष्मणराव ढोबळे यांच्या वाढदिवसानिमित्त नॉर्थकोट मैदानावर आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी अपेक्षा अनेकांना होती मात्र केवळ आमदार विजयकुमार देशमुख हे आवर्जून सरांना शुभेच्छा देण्यासाठी आले.
मालक आल्याने ढोबळे सरांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला. देशमुख यांच्या उपस्थितीत ढोबळे सरांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी आपल्या भाषणात शुभेच्छा देताना विजयकुमार देशमुख म्हणाले, ढोबळे सर तब्बल पाच वेळा आमदार राहिले आहेत. त्यामुळे राजकारणात त्यांना किमान पन्नास वर्षाचा अनुभव आहे, या पन्नास वर्षात त्यांनी अनेक कष्ट सोसले आहेत त्यांचे जीवन म्हणजे आजच्या युवकांसाठी एक प्रेरणा असल्याचे गौरवोद्गार देशमुख यांनी काढले.


















