राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सोलापूर शहर जिल्हाध्यक्ष पदी संतोष पवार तर कार्याध्यक्ष पदी जुबेर बागवान यांची निवड जाहीर करून नियुक्तीपत्र देण्यात आले.
दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहचवून पक्षाची ताकद वाढवावी आणि अजित पवार यांचे हात बळकट कराल असा विश्वास व्यक्त करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रवादी पक्षात दोन गट पडल्यानंतर अजित पवार यांच्या गटातील शहराध्यक्ष कोण याचे घोंगडे अनेक दिवसांपासून भिजत होते. जिल्हाध्यक्ष पदावर दीपक साळुंखे पाटील यांची निवड झाल्याने पुन्हा शहरासाठी शहराध्यक्ष म्हणून मराठा समाजाला संधी मिळणार नाही अशी शक्यता निर्माण झाली. त्यामुळे निवड अनेक महिन्यांपासून थांबली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरू लागली होती.
शेवटी पक्षाला अडचणीत सांभाळणाऱ्या संतोष पवार यांना शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. माजी युवक अध्यक्ष जुबेर बागवान यांची कार्याध्यक्ष पदावर निवड करण्यात आली असून मराठा आणि मुस्लिम असा सामाजिक सलोखा राखण्यात पक्षाने यश मिळवले आहेत.