सोलापूर : महानगरपालिका निवडणूक जवळ येत आहे तसे शहरात राजकीय घडामोडी वाढले आहेत नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली त्यातून समन्वयाने काम करण्याचा सल्ला पालकमंत्र्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिला. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सोलापुरात महाविकास आघाडी होणार की सर्व पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवणार हासुद्धा प्रश्नचिन्ह आहे.
महाविकास आघाडीतील पक्ष स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर याचा फायदा निश्चित भारतीय जनता पार्टीला होईल असेही बोलले जात आहे. त्यातच काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाला एमआयएम पक्षाची डोकेदुखी कायम आहे. एमआयएम पक्षाला सोबत युती करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा ऐकण्यास मिळते तसेच ऐनवेळी काँग्रेस पक्षाची एमआयएम सोबत युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
याच पार्श्वभूमीवर प्रजासत्ताक दिनी एका खासगी कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले महेश कोठे, नगरसेवक आनंद चंदनशिवे, एमआयएमचे शहराध्यक्ष फारूक शाब्दी, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते उस्मान बागवान, राष्ट्रवादीचे युवा नेते रियाज मोमीन यांची भेट झाली. पहिल्या रांगेत एकाच बाकड्यावर हे सर्व नेते बसले होते. या सर्व नेत्यांमध्ये बराच वेळ गुप्तगू झाली,
विशेष म्हणजे 2007 च्या निवडणुकीमध्ये उस्मान बागवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून महापालिका लढवताना महेश कोठे यांच्या विरोधात विडी घरकुल भागातून निवडणूक लढवली होती, त्यानंतर 2012 च्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कडून रियाज मोमीन यांनी महेश कोठे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. 2019 साली विधान सभा निवडणुकीत शहर मध्य या मतदारसंघातून महेश कोठे यांच्या विरोधात एमआयएम नेते आणि शाब्दि मैदानात होते. एकूणच या कार्यक्रमाला एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांची बराच वेळ चर्चा झाली.
यावेळी रियाज मोमीन यांनी कोठे यांना ‘अण्णा’ आम्ही सगळे तुमच्या विरोधक आहोत असे म्हणतात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. पालकमंत्र्यांनी सल्ला दिल्यापासून नगरसेवक आनंद चंदनशिवे आता महेश कोठे यांच्या जवळ जात असल्याचे चित्र आहे. एकूणच महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाची क्रेझ वाढत असल्याचे पहायला मिळते.


















