सोलापूर : सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने शहरातील महिला व मुलींसाठी विविध आठ प्रकारचे प्रशिक्षण कोर्स सुरू करण्यात येत आहेत. त्यासाठी इच्छुक महिला व मुलींचे ऑनलाइन पद्धतीने अर्ज घेण्यास 7 नोव्हेंबर पासून सुरुवात करण्यात आली आहे.
महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या आदेशानुसार उपायुक्त विद्या पोळ आणि नियंत्रण अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका महिला व बालकल्याण समितीच्या वतीने विविध कोर्सेसचे प्रशिक्षण देण्यात येत आहेत.
सोलापूर शहरातील महिला व मुलींसाठी एमएस सीआयटी, टॅली, बँकिंग, सोलर पॉवर सिस्टीम, लेडीज टेलरिंग, ब्युटी पार्लर, मार्शल आर्ट कराटे आदी 8 कोर्सचे मोफत प्रशिक्षण देण्याचे नियोजन आहे. यासाठी 14 ते 45 वर्ष वयोमर्यादा आहे. 3 महिन्याच्या कालावधीचे हे कोर्स आहेत. पिवळे व केसरी कार्ड असणाऱ्या महिला व मुलींना यासाठी ऑनलाइन अर्ज करता येईल.
शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधार कार्ड, फोटो सोबत अपलोड करणे आवश्यक आहे. पात्र महिला व मुलींनी या प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 7 ते 15 नोव्हेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत. 17 नोव्हेंबर 2022 पर्यंत पात्र – अपात्र अर्जदारांची यादी महापालिकेच्या याच संकेतस्थळावरून प्रसिद्ध करण्यात येईल, तरी इच्छुक पात्र महिला व मुलींनी ऑनलाईन अर्ज करावेत असे आवाहन महापालिका महिला व बालकल्याण समितीचे अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांनी केले आहे.


















