सोलापूर : महामानव विश्वभूषण बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात आंबेडकरी नेत्यांमध्ये दोन गट निर्माण झाले. माजी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांच्या पुढाकाराने बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मध्यवर्ती महामंडळाची नव्याने स्थापना करण्यात आली आहे.
त्या महामंडळाची वार्षिक बैठक रविवार 27 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता नॉर्थकोर्ट मैदानावर घेण्यात आली.त्या बैठकीला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. या बैठकीत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव व विश्वस्त समितीच्या कारभारावर ताशेरे ओढले गेले. त्यानंतर जयंती उत्सव व विश्वस्त समितीने पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करत महामंडळाच्या आरोपांना उत्तर देत यंदा भीमजयंती उत्सव मिरवणूक निघणारच असा निर्धार व्यक्त केला.
31 मार्च रोजी आंबेडकर हायस्कूलच्या मैदानावर नियोजित बैठकीला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. गुरुवारी होत असलेल्या बैठकीला उत्स्फूर्तपणे हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यापूर्वी आंबेडकर हायस्कूलवर बैठकीला शेकडोच्या स्वरूपात आंबेडकरी नेत्यांची उपस्थिती असायची यंदा प्रथमच हजारो आंबेडकरी अनुयायी उपस्थित आहेत. महामंडळाच्या बैठकीला ज्या प्रकारे नागरिक उपस्थित होते त्यापेक्षा जास्त नागरिक या बैठकीला उपस्थित दिसत आहेत.


















