सोलापूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सोलापुरात 164 कोटीच्या 42 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्पांचं भूमिपूजन व 8017 कोटी रुपयाच्या 250 किलोमीटर लांबीचा महामार्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी गडकरी यांनी अधिकारी आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक करताना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर हे आमच्या नागपूरचे आहेत असा विशेष उल्लेख केला. सर्वांनी मिळून जलसंवर्धनाचे काम केल्याचा मला आनंद आहे. हजारो विहिरी त्यामुळे चार्ज झाल्या, तलावात पाणी उपलब्ध झाले, दुष्काळी भागात पाणी शिल्लक राहिले, शेतीला पाणी उपलब्ध झाले, याबद्दल सर्वांचे धन्यवाद व अभिनंदन करतो. या विषयावर आणखी काम करण्याची गरज आहे.
ते पुढे म्हणाले, मी जिल्हाधिकार्यांना सूचना करतो की, चेन्नई-सुरत या नव्याने होणाऱ्या महामार्गावर तलाव बांधा, त्यामुळे पाणीटंचाई कमी होईल. खरे तर पाण्याचा प्रश्न हा महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान या भागात सर्वाधिक आहे. पाणी हाच महत्त्वाचा मुद्दा असून या महामार्गाच्या परिसरात तलाव बांधले तर शेतकऱ्याचे उत्पन्न त्यामुळे अडीच पट वाढेल आणि ते पाणी जर ड्रीपने दिले तर पाण्याची निश्चित बचत होईल अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. पहा काय म्हणाले गडकरी…👇👇👇👇
या कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर स्वामी, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, कर्नाटक खासदार रमेश जिगजेनी, ज्येष्ठ आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार बबनराव शिंदे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार राम सातपुते, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, पोलीस आयुक्त हरीश बैजल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पी शिवशंकर,पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, चीफ जनरल मॅनेजर अंशुमनी श्रीवास्तव, प्रोजेक्ट डायरेक्टर सुहास चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती होती.


















