सोलापूर: सोलापूर जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी तब्बल 82 अर्ज दाखल झाले. शुक्रवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, रणजितसिंह शिंदे यांच्यासह मावळत्या ११ संचालकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. गुरुवारी दाखल झालेल्या ८७ सह एकुण ८२ उमेदवारांचे ९८ अर्ज दाखल झाले आहेत.
सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यासाठी शुक्रवार दिनांक २८ जानेवारी हा शेवटचा दिवस आहे. गुरुवारी दिवसभर जिल्हा उपनिबंधक कार्यालयात राजकीय नेतेमंडळींनी अर्ज दाखल करण्यासाठी एकच गर्दी केली होती. मंगळवारी मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, अनगर पंचक्रोशीतील शहाजी पाटील, नारायण गुंड, विजया गुंड, मिराबाई कसबे यांनी अर्ज दाखल केले होते. गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, साठे यांची स्नुष्या वैशाली जितेंद्र साठे, आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे, सुरेश हसापुरे, विकास गलांडे, रमजान नदाफ या प्रमुखांचे अर्ज दाखल झाले.
मावळत्या संचालक मंडळातील धनश्री गलांडे, अलका चौगुले, राजेंद्रसिंह राजे भोसले, जयंत साळे, मारुती ढाळे, योगेश सोपल, संभाजी मोरे, दीपक माळी, विजय येलपले, औदुंबर वाडदेकर, बबनराव अवताडे यांनी गुरुवारी अर्ज दाखल केले. दूध संघ बचाव संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष अनील अवताडे, उपाध्यक्ष भाऊसाहेब धावणे व इतरांचे अर्ज दाखल झाले.
बळीराम साठे यांनी आपल्या सुनबाई वैशाली साठे यांचा अर्ज दाखल करून या निवडणुकीत दबावतंत्र वापरल्याचे बोलले जाते. मंगळवेढ्याचे बबनराव आवताडे यांनी आपले चिरंजीव सिद्धेश्वर आवताडे यांनाही यंदा मैदानात उतरवले आहे. ते स्वतः राहतात की मुलगा हे पुढील दिवसात स्पष्ट होईल.शुक्रवार शेवटचा दिवस असल्याने प्रशांत परिचारक, संजय शिंदे दिलीप माने,यांचे अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.


















