सोलापूर : रूपाभवानी मंदिराजवळील उड्डाणपुलावर आयशर टेम्पो आणि कंटेनर यांचा अपघात झाला. हा प्रकार सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमाराला घडला. दोन्ही वाहनांचे दर्शनी भाग चेम्बले गेले. यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री दहाच्या सुमाराला क्रेनच्या साह्याने कंटेनर आणि आयशर टेम्पो बाजूला करण्याचे काम सुरू होते. दरम्यान, वाहतूक पोलिसांनी पुलावरील अपघातामुळे पर्यायी मार्गावरून म्हणजेच सर्व्हिस रोडने वळवण्यात आली होती.
अब्दुल मोहम्मद रहीम वय २४, रा. उत्तर प्रदेश व अनोळखी पुरुष वय ५०, हे दोघेजण चालक असून ते जखमी आहेत. त्यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अब्दुल रहिम हा कंटेनर घेऊन हैदराबादच्या दिशेने जात होता, तर आयशर टेम्पोही त्याच दिशेने जात होता. पाठीमागून आयशर टेम्पोला कंटेनर धडकल्याने हा अपघात झाला.
पुलावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिसांनी सव्हिंस रोडने वाहतूक वळवली होती. पोलिस निरीक्षक धनाजी शिंगाडे, फौजदार होटकर व वाहतूक पोलिस कर्मचारी, नॅशनल हायवेचे कर्मचारी अपघातग्रस्त वाहने क्रेनच्या साह्याने बाजूला करण्यासाठी प्रयत्न करत होते. दोन्ही जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची प्राथमिक नोंद आहे. रात्री उशिरापर्यंत अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्याचे काम सुरू होते.


















