सोलापूर : सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या ३ पोलिस कर्मचाऱ्यांनी एका ट्रॅक्टर मालकाला ६ हजार रुपयांना लुटले. त्या ट्रॅक्टर मालकास कायद्याचा धाक दाखवत, बुधवारी, दि. २७ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वा. च्या सुमारास ही रक्कम घेण्यात आली. कासेगांव पोलीस दूरक्षेत्राचे ते कर्मचारी वाहतूक व्यवसायात गुंतलेल्या मंडळीवर पाळत ठेवून, असे प्रताप करीत असल्याची भावना वाहनधारकांनी व्यक्त केली.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव येथील पोलीस दूरक्षेत्राच्या ३ पोलीस कर्मचाऱ्यांनी एका शेतकऱ्याच्या विहिरीतून काढलेला गाळ मिश्रीत उपसा, त्याच शेतकऱ्याच्या शेतात घेऊन चाललेले ४ ट्रॅक्टर – ट्रॉल्या, त्या शेतकऱ्याच्या शेताजवळ अडवून, चोरून मुरुम उपसा करीत असल्याचा आरोप करीत त्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्याची धमकी देत सुमारे दोन तास ती वाहने जागेवर थांबवून ठेवली.
दरम्यान तालुका तहसीलदार आणि मंडलाचे मंडल अधिकारी यांना बोलावण्याचा अभिनय करीत, त्या त्रिकुटाने पैसे मागणीचे घोडे मैदानात सोडले. शेवटी तडजोडीत ६ हजार रुपये घेऊन त्या पोलीस तेथून पाय काढता घेतला. या परिसरात सध्या सोलापूर-तुळजापूर रस्त्यावरील प्रत्येक ठिकाणी ‘ ‘ धाबा तेथे अवैध धंदे ‘ अशी स्थिती आहे. तिथे एकाही अवैध व्यवसायिकांवर कासेगांव पोलीस दूरक्षेत्राच्या पोलिसांनी केल्याचे दिसत नाही,
या परिसरातील अवैध व्यवसायाकडे पाठ करुन, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या ट्रॅक्टर चालक-मालकांना मुरुम वाहतुक करीत असल्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल करण्याची धमक्या देत अडवणूक करून आर्थिक पिळवणूक करीत असल्याचे प्रकार नेहमीच घडत आहेत. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी तहसील कार्यालयाची स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असताना, अशा कारवाईचा ‘ ठेका ‘ या त्रिकुटाला कोणी दिला, असा सवाल आहे.
त्या ट्रॅक्टर मालकास भ्रमणध्वनीवर बोलले असता, शेळके, पोतदार आणि त्याच्या तिसऱ्या सहकाऱ्याने, विहिरीचा गाळ मिश्रीत उपसा आणणारे ४ ट्रॅक्टर अडवून १० हजार रुपयांचा ठोका टाकून ६ हजार रुपये नेल्याचे सांगितले. हे त्रिकुट, त्यांच्या वरिष्ठांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत सध्या हात धुवून घेत आहेत, असे अन्य वाहनधारकांचे म्हणणे आहे. आता या त्रिकुटाची कसून चौकशी होऊन, त्यांच्यावर पोलीस अधिक्षक सातपुते मॅडम कोणती कारवाई करतील हा सवाल आहे.