सोलापूर : शहरातील विजापूर नाका परिसरातील दोन नंबर झोपडपट्टी येथील चांद तारा मस्जिद जवळ दोन नंबर झोपडपट्टी मध्ये राहत असलेल्या निलाबाई जंगम यांच्या घरात सकाळच्या सुमारास चहा करताना सिलेंडर पेट घेतल्यानंतर घरातील सर्व बाहेर पळाले त्यानंतर त्या सिलेंडरचा स्फोट (LPG cylinder explosion) झाला, या दुर्घटनेत मोठी वित्तहानी झाली सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
गिरीधर गॅस एजन्सी कडून हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीचे गॅस सिलेंडर आले होते. सिलेंडर जुने असल्याने त्याला चिरा पडल्या होत्या त्यामुळे आतील गॅस लीक होऊन सिलेंडरने पेट घेतला अशी माहिती निलाबाई जंगम यांनी दिली.
दरम्यान याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्षा लांडगे (Varsha Landge) यांच्याशी चर्चा केली असता, त्या म्हणाल्या निश्चितच घटना दुर्दैवी आहे यामध्ये गरीब कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे या घटनेचा अहवाल मागविण्यात येईल अहवालात पाहून त्या गरीब कुटुंबाला मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले.
जर एलपीजी सिलेंडरचा स्फोट (LPG cylinder explosion) झाला किंवा गॅस गळतीमुळे (Gas leak) अपघात झाला तर ग्राहक म्हणून तुमचे अधिकार काय आहेत. 50 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स एलपीजी म्हणजेच घरगुती गॅस कनेक्शन घेतल्यावर पेट्रोलियम कंपन्या (Petroleum companies) ग्राहकाला पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर (Personal accident cover) देतात. एलपीजी सिलेंडरमधून गॅस गळती किंवा स्फोट होऊन अपघात झाल्यास 50 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत मिळू शकते.
या इन्शुरन्ससाठी पेट्रोलियम कंपन्यांची विमा कंपन्यांशी भागीदारी असते. डिलिव्हरीपूर्वी सिलेंडर व्यवस्थित आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी डीलरची असते. ग्राहकाच्या घरी एलपीजी सिलेंडरमुळे झालेल्या अपघातात जीवित आणि मालमत्तेच्या हानीसाठी नुकसान भरपाई (Compensation) देण्याची जबाबदारी कंपनीची असते. अपघातात ग्राहकाच्या मालमत्तेचं आणि घराचे नुकसान झाल्यास, 2 लाख रुपयांपर्यंतचा इन्शुरन्स क्लेम करता येतो.

















