सोलापूर : जिल्हा परिषदेची आढावा बैठक सोमवारी वादळी ठरली. या सभेत जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या स्वच्छ व सुंदर शाळा पुरस्कार सोहळ्यावर सदस्यांनी तोंडसुख घेतले तसेच उत्तर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्या स्वागताचा विषय सभेत निघाला. सीईओ दिलीप स्वामी सुद्धा व्हायबल झाले. पहिला तास शिक्षण विभागावर गाजला.
सुभाष माने, वसंतराव देशमुख, भारत आबा शिंदे, त्रिभुवन धाइंजे, ऍड सचिन देशमुख तर महिलांमध्ये रेखा राऊत, शैला गोडसे, ज्योती पाटील, सभापती रजनी भडकुंबे, रजनी देशमुख, राणी वारे हे महिला सदस्य आक्रमक दिसून आले. माढ्याचे भारत आबा शिंदे हे कायम आक्रमक असतात. प्रत्येक सर्वसाधारण सभेला त्याचे टार्गेट हे आरोग्य विभाग आणि आरोग्य अधिकारी डॉ शितलकुमार जाधव हे असतातच. यामागील ‘गोम’ काय आहे याची झेडपीत सर्वत्र चर्चा होऊ लागली आहे.
सोमवारच्या बैठकीत भारत आबा ठरल्याप्रमाणे आरोग्य विभागाची चिरफाड करत होते, तेच ते विषय घेऊन आरोग्य अधिकाऱ्याची अडचण करत होते. सगळं सभागृह या दोघांच्याच तोंडाकडं बघत होतं. भारत शिंदे हे प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेबद्दल विचारत होते. बराच वेळ या दोघांचे प्रश्न उत्तर सुरू होते त्यातच करमाळ्याचे नीलकंठ आप्पा देशमुख अचानक उठले.
त्यांनी काय लावलं हे दर तीन महिन्याला तुमचं तेच प्रश्न असतात, आम्ही बोलायचे का? नाही असे देशमुख म्हणाले. आबांना हे सहन झाले नाही. तुम्ही लई जहागीरदार आहे का? गप्प बसा असे म्हणताच नीलकंठ आप्पा चिडले, ते थेट एकेरी भाषेवर आले,त्यांच्या तोंडातून ‘ए भिकाऱ्या’ असे असंसदीय शब्द निघाले, मला जहागीरदार म्हणणार तू कोण? ये माझ्या घरी कामाला.
यावर लगेच सांगोल्याचे अतुल पवार, कुंभारीचे पक्षनेते अण्णाराव बाराचारे, आनंद तानवडे यांनीसुद्धा नीलकंठ देशमुख यांची बाजू घेतली. आबा तेच-तेच विषय काढतात, त्याच विभागाला टार्गेट करतात, त्यांचा एवढा इंटरेस्ट का? दुसऱ्यांनी कोणी बोलायचे का नाही काय? आमचे ऐकून घ्यायचे नाही काय? चार ते पाच सदस्यांनी एकदम भारत आबा शिंदे यांच्यावर आक्रमण केले. त्यामुळे आबांना नाईलाजाने खाली बसावे लागल्याचे चित्र सभागृहात पहायला मिळालं.
या वादाची चर्चा बराच वेळ सदस्यांमध्ये होती. नीलकंठ देशमुख यांना या प्रकरणी विचारणा केली असता, मी जिल्हा नियोजन समितीचा सदस्य आहे. या समितीकडून किती निधी आला, यावर्षी त्याचा खर्च कशा पद्धतीने झाला, हे मला विचारायचे होते. मात्र अर्धा तासभर आबा तेच ते विषय बोलत होते, दर सभेला त्यांचा हाच विषय असतो, मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मला अरे-तुरे ची भाषा वापरली म्हणून मी चिडलो, माझ्या तोंडून रागात हे शब्द गेले असे देशमुख म्हणाले.
















