सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची रेड पडली. सुरुवातीला अनेकांना वाटले वर माध्यमिक शिक्षण विभागात रेड झाली का? मात्र प्राथमिकचा आशेचा ‘किरण’ काळोख्यात गेला. झेडपीतला मोठा अधिकारी सापडल्याने खळबळ उडाली. सर्व कर्मचारी अधिकारी गायब झाले. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेचे धाबे दणाणले आहेत. अधिकारी व कर्मचारी दबकून आहेत. आता येणारे काही दिवस पैशाला हात लावायचा नाही रे बाबा अशा वातावरणात काम सुरू आहे.
प्राथमिक शिक्षण विभागाला स्वतःचा अड्डा बनविलेले आणि अनेक वर्षे एकाच टेबलावर ठाण मांडलेले काही असे कर्मचारी आहेत. जे साहेबाना लक्ष्मी दर्शन घडवतात. त्यामुळे भ्रष्टाचाराला चालना मिळते.
प्रहार संघटनेने निवेदन देऊन प्राथमिक शिक्षण विभागात कार्यरत राजीव गाडेकर, संजय कांबळे, तजमुल मुतवल्ली यांचे टेबल काढण्याची मागणी केली आहे.
सध्या प्राथमिक शिक्षण विभागात एकच चर्चा सुरू आहे ती म्हणजे या विभागातील (गामुकां) या तिघा कर्मचाऱ्यांची. हे तिघेच सध्या प्राथमिक शिक्षण विभाग चालवतात असं काहीसं चित्र आहे.
वर्षानुवर्ष हे सर्व एकाच विभागात आणि एकाच टेबलावर कसे काय? हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. राजीव गाडेकर यांना तर अनेक वर्षापासून शिक्षण विभागातील टेबल सुटत नाही. गाडेकर यांनी एकाच टेबलावर तळ ठोकून बरीच माया मिळवली असल्याची चर्चा जिल्हा परिषद मध्ये आहे. तजमुल मूतवल्ली हे कार्यालयीन अधिक्षक आहे की, जिल्हा परिषदेमधील कारकून? हेच कुणाला समजत नाही. कुठल्या अधिकाऱ्याला कशी माया मिळवून द्यायची, अधिकाऱ्यांचा खिसा कसा भरायचा यामध्ये कांबळे माहीर असल्याचे बोलले जाते.
किरण लोहार यांच्या लाच प्रकरणानंतर शिक्षण विभाग काय तर संपूर्ण जिल्हा परिषद बदनाम झाली आहे. शिक्षण विभाग आता स्वच्छ करण्याचा निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला आहे. लवकरच वादग्रस्त कर्मचाऱ्यांचे टेबल बदलाची ऑर्डर निघेल अशी माहिती प्रशासनाकडून मिळाली.






















