सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या पाटील हे नाव चांगले चर्चेत आले आहे. त्याला कारणेही तशीच आहेत. भीमा सहकारी कारखान्याच्या निवडणुकीत माजी आमदार राजन ‘पाटील’ यांनी पाटलांच्या पोरांना लग्ना आधीच पोरं असतात असं वादग्रस्त वक्तव्य करून खळबळ उडवून दिली. याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी राजन मालकांच्या त्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता. पाटील या शब्दाला आमच्या नेत्याने बदनाम केल्याचं ते म्हणाले.
एकीकडे ‘पाटील’ हे नाव बदनाम झालं असताना दुसरीकडे मात्र पाटील हे नाव सोलापूर जिल्हा परिषद व जिल्हा महसूल प्रशासनात मोठी पदं मिळवण्यात यशस्वी झाले आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार या काही दिवस रजेवर आहेत त्यांचा तात्पुरता पदभार कोण घेणार अशी चर्चा होती. अनेकांना वाटले हा पदभार महसूल उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले यांना जाईल. परंतु हा पदभार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्याकडे दिला आहे. यात पाटलांनी बाजी मारली.
दुसरीकडे सोलापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची पुण्याला बदली झाली, त्यांचा पदभार स्वतः सीईओ दिलीप स्वामी हे ठेवून घेतील अशी चर्चा पत्रकारांमध्ये होती यापूर्वी सुरेश काकाणी यांनी असा पदभार आपल्याकडे ठेवला होता. मात्र यात ही पाटलांनी बाजी मारली.
वरीष्ठ अधिकारी असल्याने सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांना अतिरिक्त सीईओ पदाचा अतिरिक्त पदभार स्वामी यांनी दिला आहे. सोमवारी उमेश पाटलांनी चंचल पाटील यांच्या केबिनमध्ये जाऊन त्यांचे विशेष अभिनंदन केल्याचे सांगण्यात आले. समाज कल्याण विभागाचा पदभार जाताच चंचल पाटील यांच्याकडे काही दिवसातच अतिरिक्त सीईओ यांचा पदभार मिळाला.



















