सोलापूर : ‘हर घर नल से जल’ ही केंद्र सरकारची अतिशय महत्त्वकांक्षी योजना या योजनेला प्रत्येक जिल्ह्यासाठी कोट्यावधीचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. प्रत्येक गावामध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा करणारी ही जलजीवन मिशन योजना राबवली जात आहे. मात्र या जलजीवन मिशनच्या भ्रष्ट कामामुळे सोलापूर जिल्हा परिषद बदनाम झाली. त्याला कारणीभूत म्हणजे एकमेव अधिकारी तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक ‘कोळी’.
या दीपक कोळी यांनी इतके दिवे लावलेत की, ते विझवताना अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ येत असल्याचे चित्र आहे. या योजनेत इतकी अनियमितता झाली की हा विषय अधिवेशनापर्यंत पोहोचला गेला. कोळी यांनी लक्ष्मीदर्शन करून आपली बदली करून घेतली पण त्यांनी केलेल्या कामांच्या चौकशी करता करता अधिकारी वैतागले आहेत.
आमदार सुभाष देशमुख, यशवंत माने, राम सातपुते यांच्या जिल्हा नियोजन समितीतील तक्रारीनंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चौकशी समिती नेमली. त्या समितीच्या अहवालात योजना राबवताना अनियमितता आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दीपक ‘कोळी’ यांच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला होता.
तब्बल 180 हून अधिक फायलींमध्ये गोंधळ दिसून आला. त्या फायली तपासण्याचे काम प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप ‘कोहिनकर’ नुकताच ‘कोळी’ यांच्या बदलीनंतर पदभार मिळालेल्या सुनील ‘कटकधोंड’ यांच्यावर आले. त्या सर्व फायली तपासून सुमारे 170 हुन अधिक कामांच्या नव्याने वर्कऑडर देण्यात आल्याचे समजते. त्यातच सांगोल्याच्या माजी जिल्हा परिषद सदस्य बाबा ‘कारंडे’ यांनी आपले सहकारी बाळासाहेब ‘काटकर’ यांच्या सोबत हा विषय लावून धरला आहे.
सांगोला तालुक्यातील नऊ गावांमध्ये कामे न करता ५ कोटी ७२ लाखाची बिले उचलली गेली, उप अभियंता ‘कमळे’ यांनी आपल्या नात्यातील स्थापत्य अभियंता ‘कांबळे’ यांना टेंडर दिल्याचे समोर आले. या प्रकरणाची ही चौकशी झाली आहे ‘कांबळे’ यांच्यावर कारवाई झाल्याची माहिती मिळाली परंतु या प्रकरणातील प्रमुख जबाबदार अधिकारी कमळे यांच्यावर कारवाई का होत नाही? त्यांना बडया अधिकाऱ्याचे अभय असल्याचे बोलले जात आहे.
जलजीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या अनियमिततेत प्रमुख दोष असलेले तत्कालीन अभियंता ‘कोळी’ सांगोल्याचे उप अभियंता ‘कमळे’ यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही अशी भूमिका सांगोल्याचे बाबा ‘कारंडे’ यांनी घेतली आहे.

















