सोलापूर जिल्हयात ग्रामीण, नागरी तसेच शहरी कार्यक्षेत्रासह सोमवार २५ एप्रिल २०२२ रोजी एकूण ११,२७ ७६० बालकांना देणार जंतनाशक गोळया देण्यात येणार आहेत. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आरोग्य विभागामार्फत जिल्हयात वय वर्ष 1 ते १९ या वयोगटातील बालक व किशोरवयीन मुला-मुलीना जंतनाशक गोळयाचे वाटप होणार आहे.
राष्ट्रीय जंतनाशक मोहिम यशस्वीपणे राबविणे महत्वाचे असून सध्या जिल्हयातील तापमानात वाढ झालेली आहे, त्यामुळे सकाळी ९ ते ११ पर्यंत सर्व लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी द्यावी. तसेच प्रत्येक मोहिम स्थळी शुध्द पाणी व ओ आर एस उपलब्ध करुन द्यावे. त्याचप्रमाणे कोविड-१९ विषयक आवश्यक ते खबरदारी घेण्यात यावी. असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सूचना केल्या आहेत.
जिल्हयात ही मोहिम 3068 आशा सेविका 4766 अंगणवाडी केंद्र 3709 शाळा,647 खाजगी शाळा 102 तांत्रिक शिक्षण संस्था यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत अंगणवाडयांमध्ये नोंद असलेल्या 308722 बालकांसह शाळांमधील विद्यार्थी व नोंद नसलेले बालके असे मिळून 1127760 बालकांना जंतनाशक गोळी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त वय वर्ष 1 ते १९ या वयोगटातील बालकांना व किशोरवयीन मुला मुलींना अंगणवाडी, शाळा तसेच केंद्रस्तरावर जंतनाशक गोळी देऊन त्यांच्या आरोग्याचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न होईल. ही मोहिम राष्ट्रीय जंतनाशक दिन २५ एप्रिल रोजी राबविण्यात येईल. तर २९ एप्रिल रोजी जी बालके राहून गेली असतील त्यांना गोळी देण्यात येईल्. या मोहिमेत सार्वजनिक आरोग्य विभाग, महिला व बालविकास विभाग, शिक्षण विभाग, आदिवासी विभाग यांचा समावेश आहे. असे यावेळी जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे यांनी सांगितले


















