सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने शुक्रवारी जागतिक परिचारिका दिन मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. उत्कृष्ट कार्य केलेल्या परिचारिकांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी , कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, महिला व बालकल्याण अधिकारी जावेद शेख, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहन शेगर, जिल्हा क्षयरोग अधिकारी मीनाक्षी बनसोडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉक्टर विलास सरवदे, प्रशिक्षण वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता सोनवणे, राष्ट्रपती विजेत्या आरोग्यसेविका मनीषा जाधव, नर्सेस संघटनेचे अध्यक्ष कलावती चव्हाण व इतर जिल्ह्यातील परिचारिका मोठया संख्येने उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते फॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
सीईओ दिलीप स्वामी म्हणाले, परिचारिका या प्रत्येकाच्या आयुष्यातील देवदूत आहेत. जन्मताना आणि मृत्यूसमयी सुद्धा यांचा सहवास आपणाला लाभतो. आयुष्यामध्ये या व्यक्ती प्रत्येकाच्या सेवेसाठी आपले आयुष्य खर्च करतात. यांच्यामुळेच जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सोलापूर जिल्ह्यातील आरोग्य सेविकेचा सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते होणं हे जिल्ह्याला आणि जिल्हा परिषदेला भूषणावह आहे.
कार्यकारी अभियंता कुलकर्णी यांनीही आपल्या भाषणातून परिचारिकांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर विलास सरवदे यांनी केले.



















